रेल्वेतील भोजनाच्या दर्जात सुधारणा करा
By Admin | Updated: November 10, 2016 03:07 IST2016-11-10T03:07:02+5:302016-11-10T03:07:02+5:30
नागपूरवरून ये-जा करणाऱ्या रेल्वेगाड्यातील भोजनाच्या दर्जात सुधारणा करा,

रेल्वेतील भोजनाच्या दर्जात सुधारणा करा
‘डीआरयुसीसी’ बैठक : सदस्यांनी केल्यात सूचना
नागपूर : नागपूरवरून ये-जा करणाऱ्या रेल्वेगाड्यातील भोजनाच्या दर्जात सुधारणा करा, रेल्वेगाड्यात स्वच्छता राखा तसेच देण्यात येणाऱ्या बेडरोलचा दर्जा चांगला ठेवा आदी उपयुक्त सूचना विभागीय रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीच्या बैठकीत सदस्यांनी केल्या.
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात विभागीय रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीची बैठक ‘डीआरएम’ बृजेश कुमार गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. बैठकीत वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कुश किशोर मिश्र यांनी प्रास्ताविक केले. ‘डीआरएम’ बृजेश कुमार गुप्ता यांनी विभागात केलेल्या विकासकामांची माहिती सदस्यांना दिली. यावेळी सदस्यांनी विविध प्रकारच्या सूचना केल्या. यात नागपूर रेल्वेस्थानकावर प्लॅटफार्म क्रमांक १ ते ८ दरम्यान अपंग व्यक्तींसाठी फुट ओव्हरब्रीज, लिफ्टची सुविधा, बेस किचनला कार्यक्षम करणे, जनाहारमध्ये प्रवाशांना बसण्याची सुविधा, बैतुल रेल्वे स्थानकावर कोच डिस्प्ले सुविधा, प्रेरणा एक्स्प्रेसमध्ये अतिरिक्त कोच लावणे, वर्धा रेल्वेस्थानकावरील प्लॅटफार्मची उंची वाढविणे, सेवाग्राम रेल्वेस्थानकावर शेडची व्यवस्था, वर्धा-बल्लारशा रेल्वेगाडीच्या वेळेत बदल करणे, चंद्रपूर स्थानकावर रिफ्रेशमेंट सुरू करणे, बल्लारशा येथे व्हीआयपी लाऊंज, रेल्वेस्थानकावर औषधी दुकान सुरू करणे, गोधनी रेल्वेस्थानकाचा विकास, वर्धा स्थानकावर सुलभ शौचालयाची व्यवस्था आदी सूचना करण्यात आल्या.
‘डीआरएम’ बृजेश कुमार गुप्ता यांनी सूचनांवर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. यावेळी अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक त्रिलोक कोठारी उपस्थित होते. आभार विभागीय वाणिज्य व्यवस्थापक संजय कुमार दास यांनी मानले. (प्रतिनिधी)