पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यास कारावास
By Admin | Updated: May 19, 2016 02:54 IST2016-05-19T02:54:51+5:302016-05-19T02:54:51+5:30
पत्नीचा मानसिक व शारीरिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. गावंडे यांच्या न्यायालयाने आरोपी पतीला

पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यास कारावास
नागपूर : पत्नीचा मानसिक व शारीरिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. गावंडे यांच्या न्यायालयाने आरोपी पतीला तीन वर्षे सश्रम कारावास आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
राजू ऊर्फ राजकुमार लोचनलाल ऊर्फ रोशनलाल सनोडिया (३९), असे आरोपीचे नाव असून तो सिवनी तालुक्यातील छिंदमवार येथील रहिवासी आहे. गुन्ह्याच्या वेळी तो कन्हान पटेलनगर येथे राहत होता.
प्रकरण असे की, कन्हान पटेलनगर येथील रहिवासी राजकुमार हुकुमचंद सनोडिया (२२)याची बहीण आशा (३२) हिचा विवाह राजू सनोडिया याच्यासोबत झाला होता. राजू हा आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन दारूच्या नशेत तिला मारहाण करायचा. या शिवाय सतत तिचा मानसिक व शारीरिक छळ करायचा. या प्रकाराला कंटाळून आशाने २२ आॅगस्ट २०१४ रोजी आत्महत्या केली होती.
या प्रकरणी राजकुमार हुकुमचंद सनोडिया याच्या तक्रारीवरून कन्हान पोलिसांनी भादंविच्या ४९८ (अ), ३०६ कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपी राजू लोचनलाल सनोडिया याला अटक केली होती. तत्कालीन पोलीस निरीक्षक सुभाष माकोडे यांनी तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.
गुन्हा सिद्ध होऊन न्यायालयाने आरोपीला भादंविच्या ४९८ (अ) कलमांतर्गत दोन वर्षे सश्रम कारावास, एक हजार रुपये दंड आणि ३०६ कलमांतर्गत तीन वर्षे सश्रम कारावास आणि तीन हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली.
आरोपीला या दोन्ही शिक्षा एकत्र भोगाव्या लागतील. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील संगीता पवार आणि आरोपीच्या वतीने अॅड. जी. डी. काळे यांनी काम पाहिले. सहायक फौजदार दिलीप कडू, हेड कॉन्स्टेबल अशोक काळे, शेख शब्बीर सय्यद यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले. (प्रतिनिधी)