‘टॉन्टिंग’ करणाऱ्याला कारावास
By Admin | Updated: September 1, 2016 02:56 IST2016-09-01T02:56:56+5:302016-09-01T02:56:56+5:30
शेजाऱ्याला बडग्या-मारबतच्या नावे ‘टॉन्टिंग’ (टोमणे) करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या एका हेड कॉन्स्टेबलला

‘टॉन्टिंग’ करणाऱ्याला कारावास
नागपूर : शेजाऱ्याला बडग्या-मारबतच्या नावे ‘टॉन्टिंग’ (टोमणे) करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या एका हेड कॉन्स्टेबलला बाराव्या जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती ए.सी. राऊत यांच्या न्यायालयाने पाच वर्षे सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. भागवत तुकाराम भेंडारकर (५३), असे आरोपी हेड कॉन्स्टेबलचे नाव आहे. तो पिपला फाटा भागातील साईविहार कॉलनी येथील रहिवासी आहे. घटनेच्या वेळी तो लकडगंज पोलीस ठाण्यात तैनात होता. ज्ञानेश्वर चुटे, असे मृताचे नाव होते.
खटल्याची पार्श्वभूमी अशी की, मृत ज्ञानेश्वर चुटे आणि हेड कॉन्स्टेबल भागवत भेंडारकर हे एकमेकांचे शेजारी होते. चुटे हे महावितरणचे निवृत्त कर्मचारी होते. त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा होता. या दोघांनी आपापल्या परीने आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. ही बाब आरोपी हेड कॉन्स्टेबलला समजताच त्याने चुटे यांना पाहून ‘बडग्या मारबत गेले, नाक कापून गेले’असे टोमणे मारणे सुरू केले होते. १४ एप्रिल २०१४ रोजी चुटे यांनी भेंडारकर याला गाठून तू का टॉन्टिंग करतो, अशी विचारणा करताच भेंडारकर याने चुटे यांच्याशी भांडण करून त्याला मारहाण केली होती. वसाहतीतील लोकांनी भांडण सोडवले होते.
खुद्द ज्ञानेश्वर चुटे आणि त्यांची पत्नी विजया चुटे यांनी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. परंतु पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवून चुटे यांना न्यायालयात दाद मागण्याची समज दिली होती. या प्रकारामुळे मानसिक परिणाम होऊन चुटे यांनी आपल्या खोलीत स्वत:ला बंद करून छताला नायलॉन दोरीने बांधून आत्महत्या केली होती. त्यांच्या खिशात चिठ्ठी आढळून आली होती. भेंडारकरकडून होणाऱ्या छळाची कर्मकहाणी त्यांनी चिठ्ठीत लिहून ठेवली होती. विजया चुटे यांच्या तक्रारीवरून भेंडारकरविरुद्ध हुडकेश्वर पोलिसांनी भादंविच्या ३०६ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. न्यायालयातून त्याने अटकपूर्व जामीन प्राप्त केला होता.
सबळ साक्षीपुराव्यांवरून गुन्हा सिद्ध
‘टॉन्टिंग’ करणाऱ्याला कारावास
नागपूर : या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक ए.जे. शेख आणि अमोल इंगोले यांनी केला होता. न्यायालयात सबळ साक्षीपुराव्यांवरून गुन्हा सिद्ध होऊन या आरोपी हेड कॉन्स्टेबलला न्यायालयाने शिक्षा सुनावली. न्यायालयात सरकारच्या वतीने सहायक सरकारी वकील प्रशांत साखरे, वर्षा आगलावे तर आरोपीच्या वतीने अॅड. प्रकाश जयस्वाल यांनी काम पाहिले. हेड कॉन्स्टेबल रवींद्र आग्रे आणि रवींद्र धरपाल यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले.(प्रतिनिधी)