नागपूर : गेल्या आठवड्याच्या तुलनेत सध्या नवीन कांदे आणि बटाट्यांची आवक वाढल्याने कळमन्यात जुन्या लाल कांद्याचे (गुलाबी) भाव प्रति किलो ४० ते ४५ रुपयावरून २५ ते ३० आणि बटाटे ४० ते ४५ रुपयावर ३५ रुपयापर्यंत खाली आले आहेत. शेतकऱ्यांना भाव कमी मिळत आहे, पण दरकपातीचा ग्राहकांना फायदा होत आहे. किरकोळमध्ये ४० रुपये भाव आहे. भाव कमी झाल्याने पश्चिम महाराष्ट्रातील उत्पादक शेतकरी आंदोलनाच्या तयारीत आहेत.
कळमना आलू-कांदे अडतिया असोसिएशनचे माजी अध्यक्ष जयप्रकाश वसानी म्हणाले, काही दिवसापूर्वी नाशिक, धुळे, अहमदनगर, औरंगाबादसह राजस्थान आणि मध्य प्रदेशात लाल कांद्याचे (डार्क लाल) पीक निघाले आहे. गेल्या दोन महिन्यापासून जुने कांदे (लाल) बाजारात विक्रीला होते. साठा कमी असल्याने भाव अचानक वाढून ४० ते ४५ रुपयावर पोहोचले होते. पण नवीन माल बाजारात येताच जुने कांदे २५ ते ३० रुपयावर खाली आले. पण कळमन्यात नवीन कांदे ३५ ते ४० रुपये आणि किरकोळमध्ये ४५ रुपये भाव आहे. कळमन्यात पांढऱ्या कांद्याचे भाव ५० ते ५५ रुपयावरून ४० ते ४५ रुपयापर्यंत उतरले आहेत. कर्नाटक आणि सोलापूर येथे पांढरा कांदा पावसामुळे खराब झाला आहे. सध्या धुळे येथून दररोज दोन ते तीन ट्रक येत आहेत. कळमन्यात दररोज एकूण २५ पेक्षा जास्त ट्रकची आवक आहे.
बटाटे १० रुपयांनी उतरले
कनार्टक, आंध्र प्रदेश, गुजरात, महाराष्ट्रात पुणे येथील बटाट्याचे नवीन पीक बाजारात आल्याने कळमन्यात बटाट्याचे भाव ४० ते ४५ रुपयावरून ३५ रुपयापर्यंत खाली आले आहेत. या ठिकाणचा माल कळमन्यात येत नसला तरीही कानपूर आणि आग्रा येथून मालाची जावक बंद झाली आहे. कानपूर आणि आग्रा येथून दररोज १५ ते १६ ट्रक जुन्या बटाट्याची आवक आहे. छिंदवाडा येथून दररोज एक ट्रक येत आहे. अलाहाबाद येथून पुढील महिन्यात माल येणे सुरू होईल. त्यानंतर भाव आणखी कमी होतील.
किरकोळमध्ये लसूण १५० रुपये
यंदा पावसामुळे माल खराब झाल्याने लसणाचे भाव वाढले. कळमन्यात दर्जानुसार ८० ते १२० रुपये किलो भाव आहेत. किरकोळमध्ये १५० रुपयापर्यंत विक्री होत आहे. सध्या मध्य प्रदेश आणि राजस्थान येथून दररोज दोन ट्रकची आवक आहे. नवीन लसूण बाजारात येण्यास आणखी दोन महिने लागतील, असे वसानी म्हणाले.