आहार आणि आरोग्याचे महत्त्व वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:09 IST2021-04-07T04:09:31+5:302021-04-07T04:09:31+5:30

आपले ५० टक्के शरीर हे प्रोटिन्सनीच बनलेले आहे. संपूर्ण आयुष्याची मदारच त्यावर अवलंबून असते. हे प्रोटिन्स आपल्याला डाळी, दूध, ...

The importance of diet and health increased | आहार आणि आरोग्याचे महत्त्व वाढले

आहार आणि आरोग्याचे महत्त्व वाढले

आपले ५० टक्के शरीर हे प्रोटिन्सनीच बनलेले आहे. संपूर्ण आयुष्याची मदारच त्यावर अवलंबून असते. हे प्रोटिन्स आपल्याला डाळी, दूध, दही, अंडी, मासे, तेलबिया, सुकामेवा यातून मिळते. प्रोटिन्सची गरज मनुष्याला जन्मापासून मृत्यूपर्यंत दर तीन तासांनी असते. प्रत्येकवेळी ८ ते ९ ग्रॅम इतकी, म्हणूनच अनेकजण कामावर, ऑफिसमध्ये, शाळेत डबा नेतात. त्यात नुसत्या भाजीपोळीबरोबर पिठलं, बेसन, डाळ नाहीतर पनीर असणं महत्त्वाचं. जोडीला काकडी, टमाटर, गाजर, मुळा न्यावा, दिवसभरात दोन ते तीन वाट्या वरण प्रत्येकाने दोन वेळच्या जेवणातून खावे. एकाचवेळी नव्हे. खाद्यपदार्थांना बेसन, शेंगदाणे, डाळी, दूध, दही, पनीरची जोड असावी. प्रोटीन हा महागडा प्रकार आहे, पण बालकांच्या वाढीच्या वयात, किशोरवयात मुलींना, गर्भावस्थेत, स्तनदा मातेला त्याची गरज अधिक असते. आजारपण, ऑपरेशन, अपघात, जखम भरण्यासाठी वगैरे सर्व अवस्थांमध्ये प्रोटीन्सची गरज वाढते.

खेळाडू, कामकरी, शेतकरी, मजुरांना प्रोटीन्सची गरज जास्त असते. घामावाटे १५ टक्के प्रोटीन्स जातात. वातावरणातील बदल, प्रदूषण, कशाचा शॉक बसणे, यात प्रोटीन्सची गरज वाढते. वय झाल्यावरही मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी प्रोटीन्सची अधिक गरज असते. तर शरीराच्या वाढीसाठी, झीज भरून काढण्यासाठी, पचनेंद्रियात उपयुक्त रसांची निर्मिती करण्यासाठी, हार्मोन्स, एन्झाईम्स, रक्त मांसपेशींच्या निर्मितीसाठी, रोगप्रतिकारक शक्तीसाठी प्रोटीन्स अत्यावश्यक आहे. रोज आपल्याला ५० ते ६० ग्रॅम प्रोटीन्स खायला हवे. एक वाटी वरण खाण्याने ६ ते ७ ग्रॅम प्रोटीन्स मिळतात. म्हणून आहारात वरणासोबतच शेंगदाणे, तीळ, बेसन, फुटाणे, दूध, दही, ताक भरपूर हवेत.

प्रोटीन्सचे कुपोषण सर्वदूर आढळते. पाच वर्षांपर्यंतच्या बालकात, खेडी, आदिवासी भाग मेळघाटात यामुळे होणाऱ्या बालमृत्यूंचे प्रमाण जास्त आहे. ही फार चिंतेची बाब आहे. प्रोटीन्स म्हणजे डाळी, दूध, दही, अंडी, मासे सर्व महाग असते. डाळीला शिजायलाही वेळ लागतो. कामकरी महिलांना एवढा वेळ नसतो. खेड्यापाड्यात डाळ करतच नाहीत. म्हणून बालकांचे, मुलींचे वजन फार कमी असते. स्त्रिया कृश आणि अ‍ॅनिमिकच आढळतात. १५ ते २० कॅलरीज यापासून मिळायला हव्यात.

प्रोटीन्सची कार्यक्षमता इतर आहार घटकांवर अवलंबून असते. विशेषकरून अ जीवनसत्त्वावर. म्हणून जेवणात भरपूर हिरव्या नारिंगी भाज्या, फळे असणे महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे मिश्र पद्धतीचा वापर केल्यास चांगल्या दर्जाची प्रोटीन्स मिळतात. जसे थालीपीठ, इडली, दोसा, मेतकूट, धिरडी, ढोकळा, डाळभाजी व आहारात शेंगदाणे, तीळ, खसखस, खोबरे, मेथीदाणे, सोप, ओवा, जिरे, धण्याचा भरपूर वापर करावा.

दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे कार्बोहायड्रेट्स. हे मुख्यत्वे धान्यातून, फळे, साखर यातून मिळतात. आहारात धान्याचे प्रमाण सर्वात अधिक असते. त्यापासून मुख्यत्वे ऊर्जा म्हणजेच शक्ती मिळते. ६० ते ७० टक्के कॅलरीज यापासून मिळणे जरुरीचे असते. गर्भावस्थेत याचे प्रमाण फार कमी होणे हे धोक्याचे असते. हे धान्ये डाळी, साखर, फळे, मैदा, बेड यातून मिळतात. यापासून पोट भरल्याचे समाधान मिळते. कार्बोहायड्रेट्स जीवनसत्त्व ब, कॅल्शियमच्या आणि अन्य क्षारांच्या शोषणासाठी आवश्यक असतात. यांचे खूप जास्त सेवन केल्याने चरबी वाढते. साखर, मैदा यामुळे कोलेस्टेरॉल वाढू शकते. प्रक्रिया केलेले धान्य जसे मैदा, पॉलिश केलेला तांदूळ खाऊ नये. ज्या खाद्यपदार्थात एकही जीवनसत्त्व अथवा क्षार नसतात ते आपलं पोषण करीत नाहीत. त्यांनाच जंक फूड म्हणतात. सर्व धान्ये गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, सर्व फळांचा आपल्या आहारात ऋतुमानानुसार समावेश करावा. फळांची साले काढू नये किंवा त्यांचा नुसता रस घेऊ नये. साखरेऐवजी गूळ, मध खावा.

तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे स्निग्ध पदार्थ. ते तेल, तूप, लोणी, वनस्पती तेलबिया यातून मिळतात आणि शरीराला आवश्यक असतात. आपल्या पेशींच्या आवरणात तेलातील घटक असतो. मेंदूच्या पेशींसाठीही तो आवश्यक असतो. तेलात आवश्यक फॅटी अ‍ॅसिड्स असतात. जीवनसत्त्व अ, ड, ई, क करिता आहारात तेल, तूप असणे आवश्यक आहे. तेल घाणीचे असल्यास उत्तम. नाहीतर गाळलेले असावे, पण रिफाईण्ड नको. रिफाईनिंगच्या प्रक्रियेत तेलातील चांगले क्षार, जीवनसत्त्वे नष्ट होतात. आपल्या संपूर्ण दिवसभरात तीन ते चार चमचे तेल आणि तूप खायला हवे.

Web Title: The importance of diet and health increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.