अवैध बांधकाम हटविण्याच्या आदेशाची अंमलबजावणी सुरू
By Admin | Updated: November 7, 2015 03:15 IST2015-11-07T03:15:57+5:302015-11-07T03:15:57+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व प्रसन्न वराळे यांनी गेल्या

अवैध बांधकाम हटविण्याच्या आदेशाची अंमलबजावणी सुरू
जाहीर सूचना : मनपा व नासुप्र करणार कारवाई
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व प्रसन्न वराळे यांनी गेल्या १५ आॅक्टोबर रोजी शहरभरातल्या इमारतींमधील पार्किंगसाठी राखीव जागेवर करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम हटविण्याचे आदेश दिले आहेत. महापालिका व नागपूर सुधार प्रन्यासने या आदेशावर अंमलबजावणी सुरू केली आहे. वर्तमानपत्रात जाहीर सूचना प्रकाशित करून इमारत मालकांना पार्किंगच्या जागेवरील अनधिकृत बांधकाम स्वत:च हटविण्यास सांगण्यात आले आहे. तसेच, इमारत मालकांनी स्वत: अनधिकृत बांधकाम हटविले नाही तर मनपा व नासुप्रचे अधिकारी कारवाई करतील व त्याचा खर्च इमारत मालकाकडून वसुल करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
धंतोलीत गल्लोगल्ली रुग्णालये उघडण्यात आली असून अनेक रुग्णालयांच्या संचालकांनी पार्किंग व इतर नियमांची पायमल्ली केली आहे. यासंदर्भात धंतोली नागरिक मंडळाचे अध्यक्ष विलास लोठे यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेत नागपूर काँग्रेस कमेटीचे महासचिव सुमुख मिश्रा यांनी मध्यस्थी अर्ज करून केवळ रुग्णालयेच नाही तर विविध व्यावसायिकांची कार्यालये, मंगल कार्यालये व हॉटेल्सवरही कारवाई करण्याची विनंती केली आहे. धंतोली व रामदासपेठ परिसर केवळ मेडिकल हबच नाही तर, कमर्शियल हबही झाले आहेत. दोन्ही परिसरात वकील, चार्टर्ड अकाऊन्टन्ट व अन्य व्यावसायिकांनी स्वत:ची कार्यालये थाटली आहेत. अनेक मंगल कार्यालये, दुकाने व हॉटेल्स आहेत. त्यांच्यापैकी अनेकजण पार्किंगसंदर्भातील नियमांचे पालन करीत नाहीत असे मिश्रा यांनी अर्जात नमूद केले आहे. न्यायालयाने ही समस्या केवळ धंतोली व रामदासपेठपुरती मर्यादित नसल्याचे निरीक्षण नोंदवून संपूर्ण शहरातील पार्किंगच्या जागेवरील अनधिकृत बांधकाम हटविण्याचे आदेश दिले आहेत.(प्रतिनिधी)