विदर्भवाद्यांचा भडका
By Admin | Updated: May 27, 2015 02:47 IST2015-05-27T02:47:25+5:302015-05-27T02:47:25+5:30
केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर आता विदर्भाचे ‘अच्छे दिन’ येतील, वेगळ्या विदर्भ राज्याची लवकरच घोषणा होईल, ...

विदर्भवाद्यांचा भडका
शहांचे वक्तव्य जिव्हारी : तर विदर्भात भाजप ४४ वरून ४ वर येईल
नागपूर : केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर आता विदर्भाचे ‘अच्छे दिन’ येतील, वेगळ्या विदर्भ राज्याची लवकरच घोषणा होईल, अशी अपेक्षा बाळगून असलेल्या विदर्भवाद्यांचा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी अपेक्षाभंग केला आहे. 'विदर्भ वेगळा करण्याचा शब्द आम्ही कधी कुणाला दिला नव्हता, असे शहा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे विदर्भवाद्यांचा भडका उडाला आहे. शहा खोटं बोलत आहे. त्यांना पक्षाने घेतलेल्या ठरावाची, नेत्यांनी दिलेल्या आश्वासनाची माहिती नाही. शहांचे विदर्भविरोधी वक्तव्य हे विदर्भातील जनतेच्या भावनांचा अपमान असल्याचे सांगत विदर्भवाद्यांनी शहा यांच्या या भूमिकेचा तीव्र निषेध केला आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान सत्तेत आल्यास विदर्भाचे वेगळे राज्य करू, असे हमीपत्र विदर्भवादी संघटनांना दिले होते तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील प्रत्येक जाहीर सभांमध्ये वेगळ्या विदर्भाचे उघड समर्थन करीत होते. मात्र, मंगळवारी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी विदर्भाबाबत कुठलेही आश्वासन दिले नसल्याचे वक्तव्य केले. शहा यांच्या या भूमिकेमुळे आधीच उन्हामुळे तापलेल्या विदर्भातील वातावरण आणखीणच तापले आहे. विदर्भवाद्यांनी शहा यांना लक्ष्य करीत त्यांनी विदर्भाबाबत काही वक्तव्य करण्यापूर्वी स्थानिक नेत्यांशी चर्चा करावी, असा सल्ला दिला आहे. केंद्रातील भाजप नेते विदर्भाबाबत अशीच भूमिका बदलत राहिले तर विधानसभा निवडणुकीत विदर्भात ४४ वर पोहचलेली भाजप ४ वर यायलाही वेळ लागणार नाही, असा सज्जड इशारा विदर्भवाद्यांनी दिला आहे.
हा तर जनभावनेचा अपमान
नागपूर : निवडणुकीच्या वेळी अमित शहा कुठेच नव्हते. स्थानिक नेत्यांनी आम्हाला आश्वासन दिले होते.
त्यांच्याशी चर्चा करून अमित शहांनी या विषयावर वाच्यता करायला हवी होती. भाजप शब्द बदलत असेल तर विदर्भवादी मतदारही पलटायला वेळ लागणार नाही. सत्ता विदर्भाच्या भरवशावर आली याचा त्यांना विसर पडला आहे. शहा यांच्या वक्तव्याचा मी निषेध करतो.
हा विदर्भातील जनभावनेचा अपमान आहे, असे नवराज्य निर्माण महासंघाचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष दीपक निलावार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
हा विश्वासघातच
विधानसभा निवडणूक काळात अमित शहा नागपुरात आले असता विदर्भवाद्यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी सत्ता आल्यास वेगळा विदर्भ देऊ, असे आश्वस्त केले होते. त्या शिष्टमंडळात देवेंद्र फडणवीस यांचाही समावेश होता. आता ते कुणी तसे आश्वासनच दिले नाही अशी भूमिका घेणार असतील तर हा विश्वासघात आहे. मी याचा तीव्र निषेध करतो. भाजप नेत्यांची अशीच दुटप्पी भूमिका राहिली तर ते विदर्भात ४४ वरून ते ४ वर कधी येतील हे त्यांनाही कळणार नाही.
- अॅड. मुकेश समर्थ, अध्यक्ष, व्हीकॅन
शहा खोटं बोलत आहेत
अमित शहा साफ खोटं बोलत आहेत. १९९७ मध्ये भुवनेश्वर येथे झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत वेगळ्या विदर्भाचा ठराव मंजूर करण्यात आला आहे, हे शहांना माहीत नाही का ? २०१४ च्या लोकसभा जाहीरनाम्यातही हा विषय आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासारख्या एका जबाबदार नेत्याने लेखी आश्वासन दिले आहे. आता शहांच्या ओठात एक पोटात एक असल्याचे दिसू लागले आहे. ही जनतेची फसवणूक आहे. आम्ही एकत्र बसून यावर गांभीर्याने विचार करू.
- अॅड. वामनराव चटप, मुख्य निमंत्रक, विदर्भ राज्य आंदोलन समिती
गुजरातच्या शहांना विदर्भाचे दु:ख काय कळणार ?
शहा यांचे वक्तव्य बेजबाबदारपणाचे आहे, अनैतिक आहे. गुजरातच्या व्यक्तीला विदर्भाचे दु:ख काय कळणार ? लोकसभा निवडणूक घोषणापत्रात भाजपने वेगळ्या विदर्भाचे समर्थन केले आहे. गडकरींच्या नेतृत्वात भाजपने विदर्भात मुसंडी घेतली. विदर्भवाद्यांनी वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर भाजपला साथ दिली. विदर्भाचे दु:ख अमित शहा यांना माहीत नाही. येथे वीज प्रकल्पांमुळे प्रदूषण वाढले आहे, दररोज शेतकरी आत्महत्या करीत आहेत. सिंचन प्रकल्प रखडले आहेत. कस्तूरचंद पार्कच्या सभेतही नरेंद्र मोदी यांनी वेगळ्या विदर्भाचे संकेत दिले होते. शहा यांच्या वक्तव्यावर गडकरी यांनी स्पष्टीकरण द्यावे. अन्यथा पुढील निवडणुकीत विदर्भात भाजप दिसणार नाही.
- उमेश चौबे,संयोजक, विदर्भ राज्य निर्माण समिती
शहांना पक्षाचा इतिहास माहीत नाही
शहांना स्वत:च्या पार्टीचा विदर्भाबाबतचा इतिहास माहीत नाही, असे म्हणावे लागेल. पक्षाच्या निर्णयाविरोधात एखादा अध्यक्ष जाऊ शकतो का ? अध्यक्ष हा पक्षापेक्षा मोठा नसतो. अध्यक्षाला पक्षाची लाईन सोडून बोलता येत नाही. ते त्यांचे वैयक्तिक मत असेल तर ते त्यांनी आधी स्पष्ट करावे. भाजप विदर्भ निर्मितीबाबत फारच उदासीन आहे. त्यामुळे विदर्भाने आता भाजपकडे आशा ठेवून बघणे हे बाळबोध असा विश्वास बाळगण्यासारखे आहे. या पद्धतीने भाजपची वाटचाल राहिली तर भाजपने विदर्भाकडून काडीमात्र अपेक्षा करू नये.
- अॅड. श्रीहरी अणे