कोरोना महामारीचा मानवी जीवनासह अर्थव्यवस्थेवर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:10 IST2020-12-24T04:10:18+5:302020-12-24T04:10:18+5:30
श्रेयस होले नागपूर : सरते २०२० वर्ष सर्वांच्या आयुष्यात संकट घेऊन आले. कोरोना महामारीमुळे संपूर्ण जग संकटात उभे राहिले. ...

कोरोना महामारीचा मानवी जीवनासह अर्थव्यवस्थेवर परिणाम
श्रेयस होले
नागपूर : सरते २०२० वर्ष सर्वांच्या आयुष्यात संकट घेऊन आले. कोरोना महामारीमुळे संपूर्ण जग संकटात उभे राहिले. कोरोनाचा मानवी जीवनावरच नव्हे तर अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला.
या संदर्भात लोकमतने विविध क्षेत्रातील तज्ज्ञांसोबत संवाद साधला आणि कोरोना महामारीचा त्यांच्या क्षेत्रात झालेल्या परिणामावर माहिती जाणून घेतली.
सावरत आहेत उद्योग
सध्या कार उद्योग-व्यवसायाचा वेगाने विकास होत आहे. एप्रिल, मे आणि जून या लॉकडाऊनच्या काळात काहीच विक्री झाली नाही. पण जुलैनंतर विक्री वाढू लागली आणि सप्टेंबरपर्यंत उत्साहाचे वातावरण तयार झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा डिसेंबरपर्यंत विक्री वाढण्याची अपेक्षा आहे. पण कार विक्रीचे आकडे फारसे वाढताना दिसत नाहीत. एप्रिल ते जून यादरम्यान झालेला तोटा भरून काढणे शक्य नाही.
अनुज पांडे, संचालक, इरोज ह्युंडई.
दुचाकी व्यवसायात १२ टक्के घसरण
यावर्षी दुचाकी क्षेत्रात १२ टक्के घसरण झाली आहे. लॉकडाऊन काळात विक्रीत घसरण झाली, पण गेल्या दोन ते तीन महिन्यात विक्रीत वाढ झाली आहे. पुढे विक्रीवाढीची द्वारे खुली झाली असून २०२१ मध्ये १५ टक्के वाढीची अपेक्षा आहे. लॉकडाऊनमध्ये झालेला तोटा भरून निघेल. जानेवारीपासून दुचाकीच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.
अचल गांधी, एमडी, एके गांधी टीव्हीएस.
वर्ष २०२० ने दिला जीवनाचा धडा
हे वर्ष व्यवसायासाठी पूर्णपणे वाईट नव्हते. वडिलांनी व्यवसायात दिलेली शिस्त लॉकडाऊन काळात सतत वाहून राहण्यास मदतनीस ठरली. लोक जेवणाचे ऑनलाईन ऑर्डर देत होते. त्या काळात आम्ही सुरक्षितता आणि स्वच्छतेबाबत अत्यंत सावधगिरी बाळगली. हा काळ मी आयुष्यात शिकलेल्या सर्व गोष्टींची परीक्षा ठरली. सर्व दिवस सारखे नसतात हे वर्ष २०२० ने आम्हाला शिकविले. भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा निर्माण झाल्यास आम्ही नेहमीच तयार असू.
सायरस फोन्गिंग चांग, संचालक, नानकिंग्ज रेस्टॉरंट.
हॉस्पिटलसाठी कठीण वर्ष
रुग्णालये आणि आरोग्य सेवा व्यावसायिकांसाठी हे एक कठीण वर्ष होते. कोविड रुग्ण असलेल्या रुग्णालयांना काही व्यवसाय मिळाला, परंतु त्यांनाही त्यांच्या स्वत:च्या अडचणी आल्या. कोरोना फोबियामुळे झालेल्या आर्थिक समस्यांव्यतिरिक्त रुग्णालयांनाही कर्मचाऱ्यांच्या शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागले. केवळ रुग्णालयेच नव्हे, तर कोरोना नसलेल्या रुग्णांनादेखील त्रास सहन करावा लागला. सरकार पूर्णपणे कोरोनाकडे लक्ष केंद्रित करीत होते. अनेकदा बिगर कोरोना रुग्णांना बेड मिळाले नाहीत.
डॉ. श्रीकांत मुकेवार, संचालक, मिडास हॉस्पिटल.
पहिल्या पिढीच्या उद्योजकांसाठी कठीण काळ
२०२० वर्षात पहिल्या पिढीतील व्यावसायिकांना मोठा धक्का होता. आमच्याकडे अनेक योजना होत्या, पण कोरोना महामारीमुळे पूर्ण होऊ शकल्या नाहीत. व्यवसायातील नफा आधीच स्पर्धेमुळे कमी झाला आहे. तर लॉकडाऊनमुळे मोठे नुकसान झाले आहे. आता भविष्यातील योजनांवर काम करीत आहोत. संपूर्ण परिस्थिती पाहता सकारात्मक बाजूने पुन्हा तयार होण्याची संधी दिली आहे.
प्रशांत रंजन, संचालक, कॅपेलो सलून.
पर्यटन उद्योग लसीच्या प्रतीक्षेत
२०२० वर्ष पर्यटन उद्योगासाठी अत्यंत वाईट गेले. लॉकडाऊनंतर नियोजित टूर रद्द झाले. आंतरराष्ट्रीय टूर प्लॅनर्सना नुकसान झाले. विमान कंपन्यांनी तिकिटांचे पैसेही परत केले नाहीत. त्याऐवजी भविष्यातील प्रवासासाठी क्रेडिट व्हाऊचर दिले. लोक प्रवासासाठी तयार नाहीत. अजूनही अनिश्चितता आहे. जगाच्या कोणत्याही भागात पुन्हा लॉकडाऊन होईल, हे माहीत नाही. पर्यटन उद्योग लसीच्या प्रतीक्षेत आहे. असे झाले तर हा उद्योग रुळावर येईल.
शर्मिष्ठा पचेरीवाला, भागीदार, त्रिडेंट हॉलिडेज.
इलेक्ट्रॉनिक्सची विक्री वाढली
मार्चपर्यंत विक्री सामान्य होती. लॉकडाऊननंतर विक्रीत घट झाली. लॉकडाऊन उघडताच उद्योगात काही ट्रेंड बदलताना दिसले. उदाहरणार्थ, कधीही मागणी नसलेल्या डिश वॉशर्सची विक्री वाढली. शाळा व महाविद्यालये ऑनलाईन झाल्यामुळे मोबाईल फोनच्या विक्रीत अचानक वाढ झाली. लॅपटॉपची विक्री वाढली. काही उत्पादनांची विक्री जास्त असल्याने तुटवडा जाणवत आहे.
यश गांधी, एमडी, एके गांधी सेल्यूलर.
फार्मा क्षेत्रात तेजी
फार्मा क्षेत्रात यंदा तेजी दिसून आली. व्हिटॅमिन, मास्क आणि पीपीई किटची मागणी वाढली. लॉकडाऊन कालावधीत काही नियमित सर्जिकल वस्तूंची विक्री कमी झाली, परंतु त्यांची विक्री आता सामान्य झाली आहे. दुसरीकडे, सॅनिटायझर्स आणि मास्क वापरणे ही लोकांची सवय बनली आहे. यामुळे आमच्या नियमित विक्रीत भर पडली आहे. येत्या वर्षात आणखी वाढ अपेक्षित आहे.
आशिष खत्री, संचालक, दास सर्जिकल.