नोंदणी होताच तत्काळ फेरफार

By Admin | Updated: January 17, 2017 01:52 IST2017-01-17T01:52:51+5:302017-01-17T01:52:51+5:30

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमांतर्गत दस्ताची नोंदणी होताच नोंदणी झालेल्या प्रकरणासंदर्भात नोंदणीकृत फेरफार करण्यासाठी ...

Immediate modification as soon as the registration is made | नोंदणी होताच तत्काळ फेरफार

नोंदणी होताच तत्काळ फेरफार

जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांचा पुढाकार : चकरा मारण्याची गरज नाही, एसएमएसद्वारा मिळणार माहिती
नागपूर : महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमांतर्गत दस्ताची नोंदणी होताच नोंदणी झालेल्या प्रकरणासंदर्भात नोंदणीकृत फेरफार करण्यासाठी वेगळा अर्ज करण्याची आवश्यकता नसून नोंदणी विभागाकडून फेरफार करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी सोमवारी दिली.
दस्त नोंदणी होताच फेरफारीची प्रक्रिया संदर्भातील उपक्रम सोमवारपासून संपूर्ण जिल्ह्यात सुरू झाला आहे. जिल्ह्यातील नागरिकांचे मिळकतीच्या हस्तांतरणाचे व्यवहार दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयात नोंदविले जातात. नोंदणीकृत दस्तानुसार फेरफार करण्यासाठी मिळकत धारकांना संबंधित नगर भूमापन अथवा भूमिअभिलेख कार्यालयात नामांतरण अर्ज करावा लागत होता. वस्तुत: नोंदणी झालेल्या दस्ताची माहिती संबंधितांना पाठविणे तसेच कलम ५० अन्वये संबंधित भूमापन अधिकारी अथवा तलाठी यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे फेरफार करण्यासाठी आवश्यक असतानाही नागरिकांना नामांतरणासाठी वेगळा अर्ज करावा लागत होता.
जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी या संदर्भात नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी महसूल जमीन अधिनियमांतर्गत दस्ताची नोंदणी होताच फेरफारीची प्रक्रिया तत्काळ सुरू करण्याचे निर्देश दिले असून त्यानुसार जिल्ह्यात प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. भूमिअभिलेख कार्यालयातर्फे फेरफार योग्य दस्ताची माहिती नोंदणी विभागाकडून प्राप्त होताच त्यानुसार कार्यवाहीला सुरुवात होणार आहे. प्रकरणामध्ये त्रुटी आढळल्यास अर्जदाराला एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे. अशा त्रुटींची पूर्तता करण्यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या मंगळवारी नगर भूमापन कार्यालयामार्फत विशेष शिबिर घेऊन त्रुटीची पूर्तता करण्यात येऊन फेरफार झाल्यानंतर संबंधितांना एसएमएसद्वारा कळविण्यात येणार आहे. दस्त नोंदणी व फेरफार प्रक्रिया संदर्भात भूमिअभिलेख, सहजिल्हा निबंधक नागपूर शहर व ग्रामीण, सर्व नगर भूमापन अधिकारी, उपअधीक्षक भूमिअभिलेख, सर्व दुय्यम निबंधक यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. नोंदणी होताच फेरफाराची प्रक्रिया या उपक्रमाची सुरुवात जिल्ह्यात सुरूझाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिली.(प्रतिनिधी)

Web Title: Immediate modification as soon as the registration is made

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.