मी चाललोय, पण मंथली रिपोर्ट पाठवा !
By Admin | Updated: May 1, 2015 02:22 IST2015-05-01T02:22:13+5:302015-05-01T02:22:13+5:30
अमरावती जिल्ह्यातील ‘किसान यात्रा’ आटोपून नागपुरात परतलेले काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सायंकाळी तब्बल एक तास काँग्रेस नेते व पदाधिकाऱ्यांचा ‘क्लास’ घेतला.

मी चाललोय, पण मंथली रिपोर्ट पाठवा !
कमलेश वानखेडे नागपूर
अमरावती जिल्ह्यातील ‘किसान यात्रा’ आटोपून नागपुरात परतलेले काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सायंकाळी तब्बल एक तास काँग्रेस नेते व पदाधिकाऱ्यांचा ‘क्लास’ घेतला. पदयात्रेच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांपर्यंत विषय पोहचविला. मात्र, मी गेल्यावर त्या शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला कुणी जाणार आहे का, असा सवाल राहुल यांनी काँग्रेस नेत्यांना केला.
आता स्थानिक नेत्यांवर ही जबाबदारी द्या. मी भेटी दिलेल्या भागात पुढे तुम्ही काय केले याचा दर १५ दिवसांनी किंवा महिनाभराने लेखी रिपोर्ट पाठवा, अशा कडक सूचनाही त्यांनी नेत्यांना दिला.
राहुल गांधी पदयात्रा आटोपून नागपूर विमानतळावर सायंकाळी ६.३० वाजता पोहचले. यानंतर व्हीआयपी लाऊंजमध्ये रात्री ७.४५ पर्यंत त्यांनी सर्व नेत्यांची बैठक घेतली. सुरुवातीला सर्वांचे ऐकून घेतल्यानंतर आपले रोखठोक मत मांडले. या वेळी अ.भा. काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश, सरचिटणीस मुकुल वासनिक, प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, उपनेते आ. विजय वडेट्टीवार, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, खा. अविनाश पांडे, आ. सुनील केदार, युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष विश्वजित कदम, माजी मंत्री अनिस अहमद, शहर अध्यक्ष विकास ठाकरे, जिल्हाध्यक्ष सुनिता गावंडे, काँग्रेस नेते नाना गावंडे, अनंतराव घारड, डॉ.बबनराव तायवाडे, के.के. पांडे, अतुल कोटेचा, उमाकांत अग्निहोत्री आदी उपस्थित होते.