अवैध वृक्ष कटाई; आरोपी मोकाट!
By Admin | Updated: October 11, 2014 02:54 IST2014-10-11T02:54:49+5:302014-10-11T02:54:49+5:30
गत आठवडाभरापूर्वी बुटीबोरी वन परिक्षेत्रात विना परवानगी वृक्षतोड करून, लाकडाची अवैध वाहतूक करणारा एक ट्रक पकडण्यात आला असताना, ...

अवैध वृक्ष कटाई; आरोपी मोकाट!
नागपूर : गत आठवडाभरापूर्वी बुटीबोरी वन परिक्षेत्रात विना परवानगी वृक्षतोड करून, लाकडाची अवैध वाहतूक करणारा एक ट्रक पकडण्यात आला असताना, अजूनपर्यंत संबंधित आरोपींविरुद्ध कोणतीही कारवाई करण्यात आली नसून, तो मोकाट फिरत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
वन अधिकारी संबंधित क्षेत्राचा सर्वे केल्यानंतरच सत्यता पुढे येणार असल्याचे सांगून, प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करू लागले आहे. दुसरीकडे गत आठ दिवसांपासून अजूनही येथील सर्वे झालेला नाही. हे विशेष. माहिती सूत्रानुसार आरोपीने यापूर्वीही घटनास्थळावरून चार ट्रक माल नेला आहे. शेवटी दक्षता विभागाचे डीएफओ प्रदीप मसराम यांच्या हाती पाचवा ट्रक लागला. दरम्यान मसराम यांनी प्राथमिक चौकशी केली असता, ट्रक ड्रायव्हरकडे लाकूड वाहतुकीचा कोणताही परवाना नव्हता. त्यामुळे तो ट्रक लगेच बुटीबोरी येथील वन कार्यालयात उभा करण्यात आला. मात्र आता त्या घटनेला एक आठवड्याचा कालावधी लोटला असून, अजूनपर्यंत आरोपीविरुद्ध कोणतीही कारवाई कां करण्यात आली नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. बुटीबोरी येथील वन परिक्षेत्र अधिकारी मंगेश ठेंगडी पकडण्यात आलेल्या ट्रकमधील माल खाजगी खसऱ्यातील असल्याचे सांगून स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र जाणकारांच्या मते, तो माल खाजगी खसऱ्यातील असला तरी, त्याच्या वाहतुकीसाठी वन विभागाची परवानगी घेणे आवश्यक होते. अशाप्रकारे ठेंगडी यांच्या वनपरिक्षेत्रात खुलेआम वृक्षकटाई करून, त्याची सर्रास अवैध वाहतूक केली जात असताना त्यांच्या लक्षात का आले नाही, असा सहज प्रश्न उपस्थित केला जात आहे. माहिती सूत्रानुसार काही वन अधिकारी संबंधित आरोपीशी हातमिळवणी करून संपूर्ण प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. त्यामुळेच अजूनपर्यंत कुणाविरुद्धही कारवाई झालेली नाही. (प्रतिनिधी)