कालवा सेवा पथावरून अवैध वाहतूक सुरू
By Admin | Updated: November 22, 2014 02:34 IST2014-11-22T02:34:32+5:302014-11-22T02:34:32+5:30
परिसरातील पेंच प्रकल्पाच्या कालव्याच्या भिंतीवरून (कालवा सेवा पथ) मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक सुरू आहे.

कालवा सेवा पथावरून अवैध वाहतूक सुरू
शुभम गिरडकर तारसा
परिसरातील पेंच प्रकल्पाच्या कालव्याच्या भिंतीवरून (कालवा सेवा पथ) मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक सुरू आहे. भरधाव वाहनांमुळे उडणारी धूळ शेतातील पिकांवर बसत असल्याने पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. दुसरीकडे, कालव्याच्या भिंतीची झिज होत आहे. या गंभीर प्रकाराकडे सिंचन विभागातील अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप त्रस्त शेतकऱ्यांनी केला आहे.
मौदा तालुक्यातील तारसा परिसरातून पेंच प्रकल्पाचा उजवा कालवा गेला आहे. या कालव्याद्वारे ओलित व उद्योगाला पाणी पुरविल्या जाते.
या कालव्याच्या दोन्ही भिंती मोठ्या व रुंद असल्याने त्यावर वाहनांची सहज वाहतूक होते. पूर्वी या भिंतीचा वापर सिंचन विभागाचे अधिकारी व कर्मचारी कालव्याच्या पाहणीसाठी आणि शिवारातील शेतकरी शेतीच्या वहिवाटीकरिता करायचे. हल्ली या भिंतीचा वापर सर्रास वाहतुकीसाठी केला जात आहे. या भिंतीवरून वाहतूक करण्यास सिंचन विभागाने प्रतिबंध घातला असला तरी संबंधित अधिकारी वाहनचालकांवर कारवाई करण्यास तयार नसल्याने अवैध वाहतुकीला उधाण आले आहे.
विशेष म्हणजे, कालव्याच्या या दोन्ही भिंती मातीच्या आहेत. शिवाय, त्यांची या परिसरात अंदाजे पाच कि.मी. लांबी आहे. भरधाव व ओव्हरलोड वाहनांमुळे या भिंतीवरील धूळ मोठ्या प्रमाणात शेजारी असलेल्या शेतातील पिकांवर व झाडांवर बसते. त्यामुळे पिकांचे पर्यायाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे.