खळबळजनक! नागपुरातील ‘आपली बस’च्या टाकीत जात आहे अवैध मार्गाचे डिझेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2022 08:00 IST2022-02-03T08:00:00+5:302022-02-03T08:00:18+5:30
Nagpur News अवैध मार्गाने जमविलेल्या हजारो लिटर डिझेलसारख्या द्रव पदार्थाचा वापर ‘आपली बस’च्या वाहतुकीसाठी होत असल्याचा खळबळजनक प्रकार उजेडात आला आहे.

खळबळजनक! नागपुरातील ‘आपली बस’च्या टाकीत जात आहे अवैध मार्गाचे डिझेल
नागपूर : अवैध मार्गाने जमविलेल्या हजारो लिटर डिझेलसारख्या द्रव पदार्थाचा वापर ‘आपली बस’च्या वाहतुकीसाठी होत असल्याचा खळबळजनक प्रकार उजेडात आला आहे. गुन्हे शाखेने एमआयडीसीतील हंसा सिटी बस सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडच्या बस डेपोवर छापा घालून तेथून साडेसहा लाख रुपयांचा बायोडिझेलसारखा दिसणारा द्रवपदार्थ आणि टँकर असा एकूण २६.५५ लाखाचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी डेपो मॅनेजर आणि डेपो संचालित करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे.
गैरप्रकाराचा अवलंब करून आपली बस डेपोत इंधन आणले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलीस आयुक्त अमितेशकुमार आणि गुन्हे शाखेचे उपायुक्त चिन्मय पंडित यांनी कारवाईसाठी बस डेपोवर संबंधित अधिकाऱ्यांना पाळत ठेवण्यास सांगितले होते. नागपुरात चालणारी आपली बस सेवा हंसा सिटी बस सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडतर्फे संचालित केली जाते. स्टार बसचा डेपो एमआयडीसीतील राजेंद्र नगरात आहे.
१५ जानेवारीच्या रात्री ११.४० वाजता येथे इंडियन ऑईलचा लोगो असलेला टँकर क्रमांक एमएच ०४/ ईबी २२८७ पोलिसांना आढळला. त्यातून बायोडिझेल काढले जात असल्याचे दिसताच पोलिसांनी तेथे छापा घातला. यावेळी बस डेपोचा मॅनेजर अशोक लक्ष्मणराव मराठे (वय ६०, राबहादुरा फाटा) आणि तेथील कर्मचाऱ्यांकडे पोलिसांनी डिझेल साठ्याबाबत विचारणा केली. पण त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. डिझेलच्या खरेदी-विक्री आणि साठवणुकीबाबतची कोणतीही कागदपत्रे त्यांच्याकडे नव्हती. त्यामुळे पोलिसांनी हा टँकर व अन्य काही वाहने जप्त केली.
या इंधनाची संबंधित तज्ज्ञांकडून तपासणी केल्यानंतर पोलिसांनी आपली बस डेपोचे संचालक, पदाधिकारी आणि व्यवस्थापक अशोक वरठे यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम २८५, १८८ तसेच जीवनावश्यक वस्तू कायदा कलम ३ व ७ प्रमाणे गुन्हा दाखल केला. पुढील चौकशी सुरू आहे.
डिझेल आले कुठून, पत्ता नाही !
एवढ्या मोठ्या प्रमाणात डिझेलसारखे दिसणारे हे इंधन आले कुठून, याबाबत संबंधितांकडून समाधानकारक माहिती मिळाली नसल्याचे पोलीस सांगतात. त्यांनी हा प्रचंड साठा कसा जमवला, त्याबाबतची कागदपत्रे बसच्या संचालकांकडे नाहीत, असेही पोलीस अधिकारी सांगत आहेत.
अनेक बडे मासे अडकणार
अनेक वर्षांपासून हा गोरखधंदा सुरू असून यात अनेक बडे मासे सक्रिय आहेत. ते या कारवाईच्या टप्प्यात असून या प्रकरणातील आरोपींची संख्या वाढणार असल्याचे पोलीस अधिकारी सांगत आहेत.
----