वन्यजीव विभागाचे दुर्लक्षच ‘त्या’ बिबट्याच्या जीवावर बेतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 11:39 AM2020-06-03T11:39:37+5:302020-06-03T11:40:07+5:30

सिपना वन्यजीव विभागाचे दुर्लक्षच ‘त्या’ बिबट्याच्या जिवावर बेतले असून, त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरले आहे. यात प्रादेशिक वनविभागाने केवळ बघ्याची भूमिका वठविली आहे.

Ignoring the wildlife department, the leopard was killed | वन्यजीव विभागाचे दुर्लक्षच ‘त्या’ बिबट्याच्या जीवावर बेतले

वन्यजीव विभागाचे दुर्लक्षच ‘त्या’ बिबट्याच्या जीवावर बेतले

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: सिपना वन्यजीव विभागाचे दुर्लक्षच ‘त्या’ बिबट्याच्या जिवावर बेतले असून, त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरले आहे. यात प्रादेशिक वनविभागाने केवळ बघ्याची भूमिका वठविली आहे.
नागपुरातील गोरेवाडा येथे वन्यजिवांसाठी अद्ययावत उपचार केंद्र आहे. तेथे तज्ज्ञ डॉक्टर कार्यरत आहेत. पशुवैद्यकीय प्रयोगशाळाही आहे. वन्यजिवांचे ते सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. पण, या सक्षम व्यवस्थेकडे वन्यजीव विभागाकडून दुर्लक्ष केले गेले. याच दुर्लक्षाचा तो बिबट नाहक बळी ठरला आहे.
व्याघ्र प्रकल्पाचे परतवाडा येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर हे तात्पुरते उपचार केंद्र आहे. बिबट्यासारख्या प्राण्याला ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरला उपचारार्थ तब्बल ३७ दिवस ठेवण्याची अनुमती नाही. याच ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरला दाखल कोल्ह्याला, माकडाला यापूर्वी चार-आठ दिवसांतच उपचारार्थ नागपूरच्या गोरेवाड्याला पाठविले गेले. माकड आणि कोल्ह्याला नागपूरला हलविणाऱ्यांना मात्र बिबट्याला हलवावेसे वाटले नाही. खैरी शिवारात २५ एप्रिलला प्रादेशिक वनविभागाकडून जेरबंद केला गेलेला बिबट एकदम सुदृढ, सशक्त होता. केवळ पायाला जखम होती म्हणून प्रादेशिक वनविभागाने त्याला ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरला दाखल केले आणि बघ्याची भूमिका स्वीकारली.
पहिले तीन दिवस त्याने आहारच घेतला नाही. पुढचे आठ दिवसही त्याने फारसा आहार ग्रहण केला नाही. पायाची जखम आठ दिवसातही बरी झाली नाही. पहिल्या आठ दिवसांत बिबट्याने पायही टेकवला नाही. फारशी हालचालही केली नाही. खरे तर पहिल्या आठ दिवसांतच किंवा त्यानंतर त्या बिबट्याला औषधोपचाराकरिता गोरेवाड्यात दाखल करायला हवे होते. पण, वन्यजीव विभागाने तसे केले नाही. परतवाड्यातील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरलाच त्या बिबट्याला उपचाराच्या नावावर तब्बल ३७ दिवस स्क्वीज केजमध्ये बंदिस्त ठेवले. या ३७ दिवसांत त्याला एकदाही गोरेवाडा येथील तज्ज्ञ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना दाखवावेसे वाटले नाही. केंद्रावरीलच मोकळ्या व्यवस्थेत त्याला त्यांना सोडावेसे वाटले नाही.

प्रवेश निषेध नावालाच
बिबट उपचारार्थ दाखल होताच केंद्र परिसरासह केंद्रात कुणालाही प्रवेश नव्हता. तसे फलकही लावले गेलेत. सीसीटीव्ही कॅमेरेही लावले गेले. प्रादेशिक वनविभागाच्या वनरक्षकांच्या आठ तासाच्या ड्युट्या बाहेर लावल्या गेल्यात. पण, कुणालाही प्रवेश नाही म्हणणाऱ्यांच्या डोळ्यादेखत या बिबट्याला बघण्याकरिता केंद्रात काही महिला, पुरूष व मुलांनी मात्र सरळ प्रवेश केला. त्यांनी केंद्रात बिबट्याला बघितले.

डॉक्टरांची अनुपस्थिती
ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरवर कार्यरत डॉक्टरच जवळपास आठ दिवस केंद्रावर अनुपस्थित होते. डॉक्टरांच्या अनुपस्थितीत आणि उपस्थितीतही तेथील एका कर्मचाऱ्यानेच त्या बिबट्यावर उपचार केल्याची माहिती आहे. बिबट्याच्या पायावरील जखमेवर स्प्रे मारणे आणि त्याच्याकरिता बोकडाचे मांस आणण्याचे कामही याच कर्मचाऱ्याने केले आहे.

Web Title: Ignoring the wildlife department, the leopard was killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.