इफ्तखार हसनचे हल्लेखोर गवसेना
By Admin | Updated: July 12, 2015 03:08 IST2015-07-12T03:08:06+5:302015-07-12T03:08:06+5:30
मोमिनपुऱ्यातील भतिजा ऊर्फ इफ्तखार हसन अब्दुल अजिज (वय ३६) याच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याला ६० तासांपेक्षा जास्त कालावधी झाला.

इफ्तखार हसनचे हल्लेखोर गवसेना
नागपूर : मोमिनपुऱ्यातील भतिजा ऊर्फ इफ्तखार हसन अब्दुल अजिज (वय ३६) याच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याला ६० तासांपेक्षा जास्त कालावधी झाला. मात्र, त्याच्यावर गोळ्या झाडणारे आरोपी शोधून काढण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. पोलिसांनी आरोपींना शोधण्यासाठी ताकद झोकली असतानाच इफ्तखारच्या साथीदारांनीही ‘गेम प्लान‘चा पत्ता लावण्यासाठी भाईजगतातील नेटवर्क कामी लावले आहे. गुरुवारी पहाटे ४.४५ ते ५ च्या सुमारास नमाज पठण करून घराकडे निघालेल्या इफ्तखार हसन याच्यावर चार हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. एका हल्लेखोराने चाकूने भोसकण्याचाही प्रयत्न केला. या घटनेपासून शहर पोलीस दलातील अवघी यंत्रणा तपासकामी इफ्तखारच्या हल्लेखोरांचा शोध घेत आहे. ५० पेक्षा जास्त गुन्हेगारांची पोलिसांनी झाडाझडती घेतली. मात्र, इफ्तखारचा गेम प्लान कुणी केला, त्याचा सुगावा लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही. इफ्तखारचा गेम प्लान करणारांना शोधण्यासाठी त्याचे साथीदारही कामी लागले आहे. मुंबई, हैदराबाद, मुरैनासह मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेशातील शहरातील भार्इंकडून माहिती घेतली जात आहे. (प्रतिनिधी)