कोरोनाशी युद्ध जिंकायचे असेल तर प्रत्येकाने आपली जबाबदारी गांभीर्याने समजावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:07 IST2021-07-18T04:07:55+5:302021-07-18T04:07:55+5:30

नागपूर : कोरोनाची दुसरी लाट अजूनही संपलेली नाही. पण, कोरोनाला मात देण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी समजून घेणे गरजेचे ...

If you want to win the war with Corona, everyone must take their responsibility seriously | कोरोनाशी युद्ध जिंकायचे असेल तर प्रत्येकाने आपली जबाबदारी गांभीर्याने समजावी

कोरोनाशी युद्ध जिंकायचे असेल तर प्रत्येकाने आपली जबाबदारी गांभीर्याने समजावी

नागपूर : कोरोनाची दुसरी लाट अजूनही संपलेली नाही. पण, कोरोनाला मात देण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी समजून घेणे गरजेचे आहे. कोरोनाच्या नियमांचे कटाक्षाने पालन करावे लागेल. त्याचबरोबर केंद्र व राज्य सरकारने लसीकरणाचा वेग वाढविला पाहिजे. कोरोनाच्या युद्धात लसीकरण एकमेव पर्याय आहे. पण, लसीकरणाबाबत असलेले संभ्रम दूर करण्याची गरज आहे. त्याचबरोबर आरोग्य सेवा व सुविधासुद्धा सक्षम बनविण्याचीही गरज आहे. मेडिकल व पॅरामेडिकल स्टाफबरोबरच सफाई कर्मचाऱ्यांनाही सन्मान देण्याची गरज आहे.

शनिवारी युवा चेतनातर्फे ‘कोरोना व त्याचे परिणाम’ या विषयावर वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. त्यात बोलताना वक्त्यांनी आपली मते मांडली. वेबिनारचे उद्घाटन स्वामी अभिषेक ब्रह्मचारी यांनी केले. मुख्य अतिथी म्हणून राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती इंद्रजित मोहंती, विशेष अतिथी म्हणून लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा व मुख्य वक्ता म्हणून सुपर-३० चे संस्थापक आनंद कुमार उपस्थित होते. तर वेबिनारमध्ये वक्ता म्हणून पद्मश्री डॉ. जगदीश प्रसाद, पी.डी. हिंदुजा हॉस्पिटल मुंबईचे सीईओ गौतम खन्ना, लीलावती हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर मुंबईचे उपाध्यक्ष अजय पांडे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, महिलारोगतज्ज्ञ डॉ. आकांक्षा सिंह, उद्योजक मनोज गोयल, बीएचयूचे प्राध्यापक डॉ. अजित सिंह, गौतमी हॉस्पिटल अयोध्याचे निदेशक डॉ. राकेश गुप्ता व उद्योजक वीरेश शाह उपस्थित होते. वेबिनारचे आयोजन व संचालन युवा चेतनाचे राष्ट्रीय संयोजक रोहितकुमार सिंह यांनी केले.

...

लसीकरणाबाबतचे संभ्रम दूर करणे गरजेचे - मुख्य न्यायाधीश मोहंती

राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश इंद्रजित मोहंती म्हणाले, डॉक्टर आमचे हीरो आहेत. मेडिकल व पॅरामेडिकल स्टाफने एक योद्धा म्हणून कोरोनाशी लढा दिला आहे. ते आमचे रक्षक आहेत. लसीकरणाबाबत लोकांमध्ये काही संभ्रम आहे. यामागची कारणे काय? ती दूर करणे गरजेचे आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून संभ्रम पसरविला जात आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातूनच हे संभ्रम दूर करणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वांनी पुढे यायला हवे, लोकांमध्ये जनजागृती करायला हवी.

...

शिक्षण क्षेत्रावर झाला परिणाम

सुपर-३० चे संस्थापक आनंद कुमार म्हणाले की, कोरोनामुळे शिक्षण क्षेत्रावर सर्वात जास्त परिणाम झाले. मुलांवर मानसिक दबाव वाढला आहे. ज्यांच्याजवळ सुविधा आहे, ते ऑनलाइन अभ्यास करीत आहेत. ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण सुटले आहे. सर्वांनीच अशा मुलांच्या मदतीसाठी पुढे येणे गरजेचे आहे. शिक्षण ऑनलाइन होत असल्याने, याचा लाभ घेऊन शिक्षकांनी आपली जबाबदारी लक्षात घेऊन ज्ञानार्जन करावे.

...

सर्वांनाच पुढे यावे लागेल

वेबिनारचे उद्घाटन करताना स्वामी अभिषेक ब्रह्मचारी म्हणाले, या कोरोनाकाळात युवा चेतना पूर्णत: सक्रियपणे काम करीत आहे. लोकांनी स्वत:ला सुरक्षित ठेवून गरीब व गरजवंत लोकांच्या मदतीसाठी पुढे यावे.

...

लक्षणे नसणाऱ्यांवर ठेवावी नजर

पद्मश्री डॉ. जगदीश प्रसाद म्हणाले की, कोरोना संक्रमणावर नियंत्रण मिळविण्यासाठी टेेस्टिंग वाढविणे गरजेचे आहे. त्याचबरोबर लोकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. ज्यांना लक्षणे नाहीत, त्यांच्यावर विशेष नजर ठेवावी लागेल.

...

कोरोनाचे संक्रमण अजूनही आहे

पी.डी. हिंदुजा हॉस्पिटल मुंबईचे सीईओ गौतम खन्ना म्हणाले की, नागरिकांनी दुर्लक्ष करू नये. लॉकडाऊन काढले असले तरी, कोरोनाचे संक्रमण अजूनही आहेच. रुग्णालय व डॉक्टरांच्या बाबतीत कुठलीही शंकाकुशंका ठेवू नये.

...

संत समाजाने पुढे यावे

लीलावती हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर मुंबईचे उपाध्यक्ष अजय पांडे म्हणाले की, कोरोनाची लोकांमध्ये भीती आहे. अनेक जण मानसिकदृष्ट्या त्रस्त आहेत. संत समाजाने पुढे येऊन अशा लोकांचा मानसिक त्रास दूर करणे गरजेचे आहे.

...

तातडीने चाचणी करा

बीएचयूचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. अजित सिंह म्हणाले, कोरोनाची लक्षणे जाणवताच तातडीने वैद्यकीय सल्ला घ्या. प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखावी. लसीवर कसलीही शंका घेऊ नये.

...

हा तर सेवेचा काळ !

वेबिनारच्या अध्यक्षस्थानाहून युवा चेतनाचे राष्ट्रीय संयोजक रोहित कुमार सिंह म्हणाले, अन्नधान्याच्या माध्यमातून या कोरोनाच्या काळात आम्ही सातत्याने देशातील वंचित घटकांची सेवा करीत आहोत. हा काळ राजकारण करण्याचा नसून सेवेचा आहे.

...

फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे

स्त्रीरोग विशेषज्ज्ञ डॉ. आकांक्षा सिंह म्हणाल्या, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून वाचायचे असेल तर फिजिकल डिस्टन्सिंगचे आणि मास्कच्या वापराचे पालन आवश्यक आहे. यासाठी इतरांना प्रोत्साहित करण्याचीही आवश्यकता आहे.

...

आरोग्य सुविधा सक्षम करणे गरजेचे

लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन तथा माजी खासदार विजय दर्डा म्हणाले, कोरोना संक्रमण हे एक प्रकारचे तिसरे जागतिक युद्धच आहे. हे जैविक युद्ध चीनने छेडल्याचे म्हटले जात आहे. यात जेवढी मनुष्यहानी झाली, तेवढी आजवर कधीही झाली नाही. या युद्धात विजय मिळवायचा असेल, तर देशातील आरोग्य सेवा सक्षम कराव्या लागतील. आरोग्याचे बजेट दोन-तीन टक्क्यांवरून वाढवून १० टक्के केले जाईल, तेव्हाच हे शक्य होईल. या महामारीने बरेच काही शिकविले आहे. यातून धडा घ्यायला हवा. सर्व सरकारी रुग्णालये, मेडिकल कॉलेजची स्थिती सुधारायला हवी. जनप्रतिनिधींना याचा वापर करणे बंधनकारक होईल, तेव्हाच हे शक्य होईल, अन्यथा नाही. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये उच्च न्यायालयापासून तर सर्वोच्च न्यायालयापर्यंत सर्वांनीच महत्त्वाची भूमिका बजावली. यामुळेच दुसऱ्या लाटेवर मात करता आली. व्हॅक्सिनेशनवर विशेष लक्ष द्यावे लागेल. त्याविषयीचे गैरसमज दूर करावे लागतील. बॉलीवूडचा जनमानसावर मोठा प्रभाव आहे. व्हॅक्सिनेशन, मास्क लावणे, शारीरिक अंतर राखणे, हात धुणे याबाबत धडाक्याने अभियान राबवायला हवे. बॉलीवूड व टॉलीवूडचे महत्त्व ओळखून यात याचा वापर व्हायला हवा.

Web Title: If you want to win the war with Corona, everyone must take their responsibility seriously

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.