प्रामाणिक आहात तर दोन लाख जमा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 11:18 IST2019-02-21T11:16:10+5:302019-02-21T11:18:00+5:30
जनहित याचिका दाखल करणारे सामाजिक कार्यकर्ते रोहित गौर यांना प्रामाणिकता सिद्ध करण्यासाठी दोन लाख रुपये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जमा करण्याचा आदेश बुधवारी देण्यात आला.

प्रामाणिक आहात तर दोन लाख जमा करा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मेयो रुग्णालयापुढील भोईपुरा येथील किरकोळ मासोळी बाजार मंगळवारी मार्केट इमारतीमध्ये स्थानांतरित करण्यासाठी जनहित याचिका दाखल करणारे सामाजिक कार्यकर्ते रोहित गौर यांना प्रामाणिकता सिद्ध करण्यासाठी दोन लाख रुपये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जमा करण्याचा आदेश बुधवारी देण्यात आला. यासाठी गौर यांना दोन आठवड्याचा वेळ देण्यात आला.
प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. महानगरपालिकेने मासोळी विक्रेत्यांकरिता मंगळवारी येथे तीन कोटी रुपये खर्च करून इमारत बांधली आहे. त्या इमारतीमध्ये किरकोळ विक्रेत्यांसाठी १०८ ओटे तर, ठोक विक्रेत्यांसाठी चार गाळे आहेत. या इमारतीत भोईपुरा बाजारातील ११ किरकोळ विक्रे त्यांना ओटे देण्यात आले होते. त्यामोबदल्यात त्यांना माफक भाडे मनपाला द्यायचे होते. परंतु, ते विविध प्रकारच्या तक्रारी करून मोफत जागा मागत आहेत. तसेच, भोईपुरा येथे फुटपाथ व रोडवर व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. परंतु, कारवाई पथक निघून गेल्यास ते पुन्हा त्याच ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी बसतात अशी माहिती मनपाने न्यायालयाला दिली. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने याचिकाकर्त्याच्या प्रामाणिकतेवर संशय व्यक्त करून त्यांना दोन लाख रुपये जमा करण्यास सांगितले. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. सेजल लखानी, मनपातर्फे अॅड. सुधीर पुराणिक तर, मध्यस्थातर्फे अॅड. फिरदोस मिर्झा यांनी बाजू मांडली.