लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकीकडे जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन पुरवठ्यावर आलेले निर्बंध आणि दुसरीकडे गॅस सिलिंडरच्या किमतीत झालेली मोठी वाढ; या दुहेरी कात्रीत नागपुरातील हॉटेल आणि छोटे अडकले व्यावसायिक आहेत.
'जर सिलिंडरच मिळणार नसेल, तर आम्ही आमचा व्यवसाय सुरू तरी कसा ठेवायचा?' असा संतप्त सवाल आता शहरातील उद्योजकांकडून विचारला जात आहे. केवळ दोन ते तीन दिवसांचा साठा शिल्लक असल्याने, नागपूरच्या खाद्यसंस्कृतीवर आणि हजारो कामगारांच्या रोजगारावर आता अनिश्चिततेचे सावट पसरले आहे. अनेकांनी हॉटेल्सचे 'मेन्यू कार्ड' बदलण्याची तयारी सुरू केली आहे.
दरवाढीचा दुहेरी फटका
- पुरवठा कमी झाला असतानाच दरात झालेली वाढ व्यवसायासाठी 'दुष्काळात तेरावा महिना' ठरत आहे. घरगुती सिलिंडर ६० रुपयांच्या वाढीसह ९६४.५० रुपयांवर आणि व्यावसायिक सिलिंडर ११५ रुपयांच्या वाढीसह २०५९ रुपयांवर गेले आहेत.
- हॉटेल व्यावसायिक म्हणाले, आम्ही किती दिवस साठ्यावर काम चालवणार ? जर सरकारने तत्काळ पुरवठा सुरळीत केला नाही, तर आम्हाला आमचे व्यवसाय बंद करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. युद्धजन्य परिस्थिती असली तरी गरिबांच्या आणि व्यावसायिकांच्या चुली विझणार नाहीत, याची जबाबदारी सरकारने घ्यायला हवी.
- सरकारने जरी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर ठेवण्याचे आश्वासन दिले असले, तरी गॅस सिलिंडरच्या रूपाने महागाईचा भडका उडाला आहे. पुरवठ्यावरील ही तात्पुरती बंदी जर लांबली, तर नागपुरातील अनेक व्यावसायिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत.
पुरवठ्यावर बंधने; व्यवसायाचे चक्र विस्कळीत
तेल कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरच्या वितरणावर मर्यादा आणल्याने दररोज लागणाऱ्या इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. अनेकांकडे केवळ दोन ते तीन दिवसांचा साठा शिल्लक असून, नवीन सिलिंडर मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. विशेषतः कॅटरिंग आणि लहान उपहारगृहे ज्यांचा दररोजचा व्यवहार इंधनावर अवलंबून आहे, त्यांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे.
व्यावसायिकांच्या प्रमुख अडचणी :
अनिश्चितता : पुरवठा कधी सुरळीत होईल याची स्पष्टता नसल्याने ऑर्डर कशा स्वीकारायच्या, असा प्रश्न कॅटरर्ससमोर आहे.मजुरी आणि खर्च : गॅस उपलब्ध नसल्यास कामगारांचा पगार आणि दुकानाचे भाडे कसे द्यायचे, ही चिंता हॉटेल चालकांना सतावत आहे.ग्राहकांचा रोष : सिलिंडर महागल्याने पदार्थाचे दर वाढवावे लागतील, ज्यामुळे ग्राहक कमी होण्याची भीती आहे.