दीपिकासोबत माझी जोडी गाजली तर आनंदच
By Admin | Updated: December 2, 2015 03:19 IST2015-12-02T03:19:20+5:302015-12-02T03:19:20+5:30
दीपिका पदुकोन ही अतिशय हुशार आणि भूमिका समजून घेणारी नायिका आहे. चेहऱ्यावर नेमकेपणाने भाव व्यक्त करण्यात दीपिकाला तोड नाही.

दीपिकासोबत माझी जोडी गाजली तर आनंदच
अभिनेता रणवीर सिंह : बाजीराव पेशवे साकारणे आव्हानच होते
नागपूर : दीपिका पदुकोन ही अतिशय हुशार आणि भूमिका समजून घेणारी नायिका आहे. चेहऱ्यावर नेमकेपणाने भाव व्यक्त करण्यात दीपिकाला तोड नाही. तिच्यासारख्या कसलेल्या कलावंतांसह काम करण्याची संधी मला मिळाली, याचे मला समाधान आहे. आता चित्रपट रसिक दीपिका आणि माझी जोडी पसंत करीत आहेत, ही आनंदाचीच बाब आहे. भविष्यात दीपिका आणि रणवीर अशी जोडी लोकप्रिय झाली तर मला नक्कीच आवडेल. पण त्यासाठी तिच्यासारख्या नायिकेसह काम करण्याची संधी मला मिळायला हवी, असे मत बाजीराव मस्तानी चित्रपटात बाजीराव पेशवे यांची भूमिका साकार करणाऱ्या अभिनेता रणवीर सिंह याने व्यक्त केले.
‘बाजीराव मस्तानी’ सिनेमाच्या प्रसिद्धी आणि प्रचारासाठी नागपुरात आला असताना रणवीर सिंहने मंगळवारी लोकमत भवनातील जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत पत्रकारांशी संवाद साधला. ‘बाजीराव मस्तानी’ सिनेमात बाजीराव पेशवे साकारणे माझ्यासाठी आव्हानच होते. बाजीराव हे त्या काळातले महान योद्धा होते. त्यामुळे त्यांच्या भूमिकेत घुसणे माझ्यासाठी कठीण होते. त्यासाठी पेशवा घराण्याचा इतिहास मी २१ दिवस समजून घेतला. जुहूच्या एका हॉटेलमध्ये मी स्वत:ला २१ दिवस कोंडून घेतले होते. बाजीराव पेशव्यांच्या भाषेचा लहेजा समजून घेण्यासाठीही मला परिश्रम करावे लागले पण मी त्यात काही प्रमाणात यशस्वी झालो. पेशव्यांच्या इतिहासाबाबत काही आक्षेप असतीलही पण हा सिनेमा पेशवा घराण्याचा इतिहास या पुस्तकावर आधारित आहे.
त्या पुस्तकाला केंद्रस्थानी ठेवून हा चित्रपट संजय लीला भन्साली यांनी दिग्दर्शित केला आहे. बाजीरावांच्या भूमिकेत शिरण्यासाठी मी अभ्यास केला पण त्यांच्यासारखे दिसण्यासाठीही मला प्रयत्न करणे आवश्यक आहे. भन्साली यांनी तर माझे त्यासाठी मुंडनच केले. मुंडन न करताही मेकअपने मला हा लूक साधता आला असता पण मेकअप करायला त्यामुळे तब्बल दोन-अडीच तास लागले असते. हे चित्रीकरण जवळपास दीड वर्ष चालणार होते. त्यामुळे मुंडन करून घेणेच मला योग्य वाटले. माझ्यासह काम करणाऱ्या आदित्य पांचोली आणि मिलिंद सोमण यांनी मेकअपला प्राधान्य दिले पण त्यांना दोन तास मेकअपला द्यावे लागले आणि त्यामुळे त्यांच्या डोक्याला गरमीही खूप झाली. आदित्य पांचोली तर सतत ए.सी.च्या समोरच राहिले. या साऱ्या त्रासापासून मी वाचलो, असे रणवीर सिंह म्हणाला.
प्रत्येक भूमिका कलावंतांसाठी एक आव्हानच असते. बाजीराव पेशवा साकारणे ही माझ्यासाठी आतापर्यंतची सर्वाधिक आव्हानात्मक भूमिका होती. पण तरीही प्रत्येक भूमिका एक आव्हान घेऊनच येत असते. ‘बँड बाजा बारात’ हा माझा पहिलाच सिनेमा. त्यावेळी मी नवीन होतो आणि कॅमेरा कसा फेस करायचा येथपासून अभिनयापर्यंत मला बराच संघर्ष करावा लागला. त्यानंतर ‘लुटेरा’ हा चित्रपट वेगळ्या धाटणीचा होता.
त्यानंतर ‘रामलीला’ सिनेमात काम करताना भन्सालीच्या रंगात रगणे कठीणच झाले. पण ती भूमिकाही रसिकांच्या पसंतीला आली. ‘दिल धडकने दो’ हा चित्रपटही वेगळा होता. पण आता बाजीराव साकारताना माझ्या अभिनयाचा कस लागला. प्रत्येक संघर्षातून आपण काहीतरी शिकत असतो आणि समृद्ध होत असतो, हा माझा अनुभव आहे.
या चित्रपटात मल्हारी... या गीताचा ऱ्हिदम अफलातून आहे. हा ऱ्हिदम ऐकल्यावर कुणाचेही पाय थिरकल्याशिवाय राहणार नाहीत. या गीतावर नृत्य करण्यासाठी मला खूप एनर्जी लागली. त्यात आमची टिम मस्त जमली होती म्हणून काम करताना मजा आली.
गोविंदा, अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, आमीर खान हे माझे स्क्रिन आयडॉल आहेत. त्यामुळे त्यांच्याशी माझे नाव कुणी जोडले तर मला ती कॉम्प्लीमेन्ट वाटते. लहानपणापासून मी हिंदी सिनेमाचा चाहता असल्याने केव्हातरी मी देखील यांच्यासारखे सिनेमात काम करावे, असे मला वाटत होते. आता त्या स्वप्नाकडे मी अग्रेसर होतो आहे आणि चाहत्यांना माझे काम आवडते आहे, यापेक्षा एखाद्या कलावंताला काय हवे? असा प्रश्न करून त्याने निरोप घेतला. (प्रतिनिधी)
नागपूरला येऊन आनंद झाला
मी नागपूरला प्रथमच आलो आहे पण येथे आल्यावर मी नागपूरसाठी नवा आहे, असे मला वाटलेच नाही. नागपूरचे प्रेक्षक आणि येथील संत्री मी ऐकून आहे. हे कलावंतांवर प्रेम करणाऱ्यांचे शहर आहे, याची प्रचिती मला आली. नागपूर हे खरेच खूप छान शहर आहे आणि येथील लोक त्यापेक्षा छान आहेत. यानंतरही मला नागपूरला यायला आवडेल. माझ्या या सिनेमालाही नागपूरकर रसिक प्रतिसाद देतील, अशी खात्री त्याने व्यक्त केली.