प्रायश्चित्त केल्यास आयुष्य सुखकर होईल
By Admin | Updated: January 24, 2015 02:22 IST2015-01-24T02:22:42+5:302015-01-24T02:22:42+5:30
तुमच्याकडून ‘त्या‘ क्षणी चूक झाली असेल, ती पुन्हा करू नका. प्रायश्चित्त करा. चुकांचे प्रायश्चित्त केले तर पुढचे आयुष्य सुखकर करता येईल, ...

प्रायश्चित्त केल्यास आयुष्य सुखकर होईल
नागपूर : तुमच्याकडून ‘त्या‘ क्षणी चूक झाली असेल, ती पुन्हा करू नका. प्रायश्चित्त करा. चुकांचे प्रायश्चित्त केले तर पुढचे आयुष्य सुखकर करता येईल, असे सांगत ‘द रिअल हिरो‘ डॉ. प्रकाश बाबा आमटे यांनी बंदिवानांना भावी आयुष्याच्या वाटचालीचा मंत्र दिला.
गुलमोहोर बहुद्देशीय संस्था आणि अ.भा. मराठी नाट्य परिषदेच्यावतीने आज येथील मध्यवर्ती कारागृहात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आणि मंदाकिनी आमटे यांचा ‘बंदिवानांशी संवाद ‘ कार्यक्रम ठेवला होता. मंचावर डॉ. आमटे दाम्पत्यासह विभागीय आयुक्त अनुपकुमार श्रीवास्तव, डॉ. प्रकाश बाबा आमटे : द रिअल हिरो चित्रपटाच्या निर्मात्या, दिग्दर्शक समृद्धी पोरे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी अशोक मलवाड उपस्थित होते.
समृद्धी पोरे यांनी डॉ. प्रकाश आणि मंदाकिनी आमटे यांच्या जीवनावर आधारित ‘द रिअल हिरो‘ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली. हा चित्रपट अमेरिकेतील अनिवासी भारतीयांपासून रस्त्यावरच्या हातगाडीवाल्यापर्यंत प्रत्येकालाच आवडला आहे. मध्यवर्ती कारागृहात बंदिवानांना हा चित्रपट दाखवण्यात आला असून, त्यातून ‘जीवनाचा अर्थ‘ कळल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर, कारागृहाच्या भिंतीआड बंदिस्त असलेल्या बंदिवानानी या चित्रपटातून काय बोध घेतला, ते जाणून घेण्यासाठी या ‘संवाद‘ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. आमटे यांनी ४१ वर्षांच्या ‘सेवाव्रता‘ची काही पाने यावेळी उलगडली. ते म्हणाले, शानशौकीचे जीवन म्हणजे, सुख नव्हे. जेथे अजूनही किमान नागरी सुविधा उपलब्ध नाही,अशा आदिवासी भागात कार्य सुरू केले. झोपडे, गरिबीत जगणारी ही मंडळी नीतीमत्ता पाळणारी आहे. पोटाची भूक विझविण्यासाठी त्यांनी कंदमुळे, माकड, उंदीर, मुंग्या खाल्ल्या. मात्र, ते कधी भीक मागत नाही. कपडे घालून आलेला माणूस पाहून पळून जाणारी या आदिवासी, माडिया मंडळीला डॉक्टर आहोत म्हणून नुसते औषध देऊन भागणार नाही, असे लक्षात आले. त्यामुळे त्यांच्यात काम करण्यासाठी त्यांचे राहणीमान, भाषा, संस्कृती आत्मसात केली आणि अन् त्यांना आपले केले. आज खूनासारखे प्रकार सोडले तर प्रत्येक भांडणाचा निवाडा आपल्या अंगणात ते करवून घेतात, हे सांगताना त्यांनी ‘विश्वास एक अजीब चिज‘असल्याचे सांगितले.
या निष्पाप जीवांची सेवा करताना जे समाधान मिळते, ते अमूल्य आहे. चांगल्या हेतूने जे काम करतो, त्याचे परिणाम उशिरा मिळतात, मात्र मिळतात जरूर अन् ते भक्कम असतात, असेही डॉ. आमटे म्हणाले. तुमच्या हातून जे घडले, ते जाऊ द्या. भविष्यात चांगल्या कामाचा निश्चय करा, तुमचे जीवन सुखमय होईल, असा विश्वासही त्यांनी बंदिवानांना दिला.यावेळी मंदाकिनी आमटे यांनीही बंदिवानांना चांगले विचार आत्मसात करा. वर्तनात सुधार करा, असा सल्ला दिला. तुम्हा सर्वांची शिक्षा कमी होऊन तुम्ही लवकर कारागृहाबाहेर या. स्वत:ला, कुटुंबीयांना आणि समाजाला सुखी करा, असा हितोपदेशही केला. आपण निर्दोष आहो तरीसुद्धा कारावासाची शिक्षा भोगत असल्याची व्यथा एका कैद्याने मांडली. त्याला चांगल्या वकिलातर्फे कायद्याची लढाई लढ, असा सल्ला देतानाच ‘तू’ लवकर कारागृहाबाहेर यावा, यासाठी मी ईश्वराकडे प्रार्थना करते, असे म्हणत दिलासाही दिला. यावेळी विष्णू मनोहर, महपालिकेचे उपायुक्त प्रमोद भुसारी, अॅड. श्रीकांत बडगे, गुलमोहोरच्या सुजाता देव, दीपाली घोगे, रश्मी बडगे, संजय रहाटे, शुभदा घाटे, सुनील देव प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन आणि आभार अनुक्रमे संकेत वाघे आणि शुभम घाडगे यांनी केले. यावेळी विविध कैद्यांनी वेगवेगळे प्रश्न विचारले. काहींनी व्यथाही मांडल्या. त्या ऐकून उपस्थित सारेच स्तंभित झाले. (प्रतिनिधी)
पोरे गहिवरल्या
श्रीमंतीचा हव्यास असलेली मंडळी लोकांचे ओरबडून घेतात. मात्र, फक्त देण्याचेच काम करणारा माणूस किती श्रीमंत होऊ शकतो, त्याचे उदाहरण डॉ. प्रकाश आमटे यांच्या रूपात पाहता येते, असे गौरवोद्गार सिनेमाच्या निमार्त्या, दिग्दर्शक समृद्धी पोरे यांनी काढले. बंदिवानांनी चित्रपट पाहून व्यक्त केलेल्या भावना ऐकून पोरे यांना भरून आले. अश्रूंना वाट मोकळी करून देताना या चित्रपटाचे हेच खरे यश असल्याचे त्या म्हणाल्या.
आमटे दाम्पत्य प्रकाशवाट
आमटे दाम्पत्याचे जीवन म्हणजे प्रकाशवाटच आहे, असे गौरवोद्गार विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी काढले. त्याच्या कर्तृत्वातून अंधारातून उजेडाकडे जाण्याचा मार्ग प्रशस्त होतो, असेही ते म्हणाले. बंदिवानांच्या भावना लक्षात घेत त्यांनी ‘तुमच्या अभिवचन रजा’ अडवून ठेवणार नाही, असे आश्वासन देत बंदिवानांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले.
कपडेच फक्त हिरवे
महिला बंदिवानांनीही हा चित्रपट कारागृहात बघितला. ‘संवाद‘ आटोपल्यानंतर डॉ. प्रकाश आणि मंदाकिनी आमटे महिला बंदिवानांची भेट घेण्यासाठी त्यांच्या बराकीकडे गेले. त्या ‘रिअल हिरो‘ची वाटच बघत होत्या. डॉ. आमटे समोर येताच एकीने सहा महिन्यांचा चिमुकला त्यांच्यापुढे धरला. ‘याच्या डोक्यावर हात ठेवा. त्याचे भविष्य उज्ज्वल होईल‘, असे ती म्हणाली. एका महिला बंदिवानाची १५ वर्षीय मुलगी नातेवाईकांकडे आहे. वृत्तपत्रात रोज महिला-मुलींवर बलात्काराच्या घटना घडतात. तिचे काय होत असेल, असा प्रश्न ‘त्या‘ माऊलीला सतावत आहे. कारागृहाची घंटा वाजल्यानंतर ‘ आपल्या मुक्ततेचा मार्ग मोकळा झाल्याचे सांगणारा कुणी येईल. आपणही बाहेरचे जग पाहू‘ असे वाटते. मात्र, बाहेरचे जगच काय, नवा चेहराही दिसत नाही. फक्त हिरवेच कपडे बघायला मिळतात. बाकी सर्व रटाळच आहे, असे म्हणत अनेक जणी ओक्साबोक्सी रडू लागल्या. त्यामुळे सारे वातावरणच गलबलले. आम्ही येथून लवकर बाहेर पडलो तर तुमच्याकडेच येऊ, उर्वरित जीवन सार्थकी लागेल, अशी भावना व्यक्त करीत महिला बंदिवानांनी डॉ. आमटे दाम्पत्याला निरोप दिला.