शहराची ओळख कायम असावी
By Admin | Updated: June 1, 2016 03:06 IST2016-06-01T03:06:27+5:302016-06-01T03:06:27+5:30
स्मार्ट सिटी म्हणून विकसित करताना नागपूर शहराची मूळ ओळख कायम असावी. स्मार्ट सिटी अंतर्गत सध्या देण्यात येत असलेल्या सुविधा अधिक प्रभावीपणे मिळाल्या पाहिजेत.

शहराची ओळख कायम असावी
स्मार्ट सिटी कार्यशाळा : पाच ठिकाणी मेट्रोचे टर्मिनल स्टेशन
नागपूर : स्मार्ट सिटी म्हणून विकसित करताना नागपूर शहराची मूळ ओळख कायम असावी. स्मार्ट सिटी अंतर्गत सध्या देण्यात येत असलेल्या सुविधा अधिक प्रभावीपणे मिळाल्या पाहिजेत. तसेच शहरातील सर्वसामान्य नागरिकांना परवडेल अशा प्रकारे शहराचा विकास व्हावा, असे मत महापौर प्रवीण दटके यांनी यावेळी व्यक्त केले.
पहिल्या टप्प्यात स्मार्ट सिटी म्हणून निवड होण्यासाठी महापालिकेने सादर केलेला प्रस्ताव चांगला होता. तथापि केंद्र शासनाने जे निकष लावले होते त्याआधारे प्रस्तावात काही त्रुटी आढळून आल्या. त्या सुधारित प्रस्तावात दुरुस्त केल्या जात आहेत. शहरात महापालिका व नासुप्र या दोन विकास संस्था असल्यातरी स्मार्ट सिटीसाठी स्थापन करण्यात आलेल्या स्पेशल पर्पज व्हेईकल मध्ये लोकप्रनिधीसह विविध क्षेत्रातील संस्थांचे प्रतिनिधी व अधिकाऱ्यांचा समावेश राहणार आहे. सुधारित प्रस्ताव सर्वसमावेशक राहील, असा विश्वास दटके यांनी व्यक्त केला.
श्रावण हर्डीकर यांनी कार्यशाळेचा उद्देश विषद करून सादरीकरणाव्दारे नवीन प्रस्तावातील महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष वेधले. रिट्रोफिटींग, रिडेव्हलपमेंट व ग्रीनफिल्ड, स्मार्ट सिटी अहवालाचे स्वरूप प्रस्तावाच्या जमेच्या बाजू व अडचणी याविषयी माहिती दिली. शहर स्वच्छ, सुंदर, हिरवे व सुरक्षित त्याचबरोबर पर्यावरणपूरक, माहिती व तंत्रज्ञान, शैक्षणिक दृष्टीने उपयुक्त राहील, असा प्रस्ताव तयार करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. दयाशंकर तिवारी यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.
यावेळी स्थापत्य समितीचे सभापती सुनील अग्रवाल, झोन सभापती विद्या लोणारे, नीलिमा बावणे, महिला व बालकल्याण सभापती रश्मी फडणवीस, नगरसेविका वर्षा ठाकरे, उपायुक्त रंजना लाडे, अधीक्षक अभियंता शशिकांत हस्तक, आरोग्य उपसंचालक डॉ. मिलिंद गणवीर, कॉन्फडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्सचे बी.सी.भरतीया, व्हीटीएचे जे.पी.शर्मा, तेजिंदरसिंग रेणू, इंदरजितसिंग बावेजा, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे विपणन व्यवस्थापक अतुल ठाकरे, एन.एस.सी.सी.चे विक्रम नायडू, हेमंत लोढा, एसएनडीएलचे राजेश तुरक, दीपक लाबडे, हनुमंत हेडे, मनीष वाठ यांच्यासह विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर यांनी तर आभार कार्यकारी अभियंता महेश गुप्ता यांनी मानले.(प्रतिनिधी)