खोट्या दस्तऐवजावर आदर्श शिक्षक पुरस्कार

By Admin | Updated: February 12, 2015 02:21 IST2015-02-12T02:21:46+5:302015-02-12T02:21:46+5:30

बेझनबाग येथील गुरू नानक उच्च माध्यमिक शाळेचे शिक्षक अशोक भड यांनी खोटे दस्तऐवज सादर करून आदर्श शिक्षकाचा पुरस्कार प्राप्त केला ...

Ideal teacher award for false documents | खोट्या दस्तऐवजावर आदर्श शिक्षक पुरस्कार

खोट्या दस्तऐवजावर आदर्श शिक्षक पुरस्कार

नागपूर : बेझनबाग येथील गुरू नानक उच्च माध्यमिक शाळेचे शिक्षक अशोक भड यांनी खोटे दस्तऐवज सादर करून आदर्श शिक्षकाचा पुरस्कार प्राप्त केला आणि शासनाची फसवणूक केली, असा आरोप करणाऱ्या एका दाखल फौजदारी खटल्यात प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी आनंद बोरकर यांच्या न्यायालयाने सोनेगाव पोलिसांना चौकशी करण्याचे निर्देश देऊन एक महिन्यात अहवाल मागितला आहे. चौकशीदरम्यान जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्याकडून आरोपाशी संबंधित माहिती गोळा करण्याचे निर्देशही न्यायालयाने पोलिसांना दिले.
शंकरराव धवड पॉलिटेक्निकच्या इलेक्ट्रॉनिक व टेलिकॉम्युनिकेशन विभागाचे निष्कासित झालेले प्रमुख हेमंत दारव्हेकर यांनी हा खटला दाखल केला. खटल्यात त्यांनी केलेल्या आरोपानुसार भड यांना २००३ मध्ये आदर्श शिक्षकाचा पुरस्कार प्राप्त झाला. वास्तविक हा पुरस्कार प्राथमिक आणि माध्यमिक प्रवर्गातील शिक्षकांनाच देण्यात येतो. भड हे उच्च माध्यमिक प्रवर्गात सुरुवातीपासूनच कार्यरत आहेत. ते अकरावी आणि बारावीला जीवशास्त्र शिकवतात.
आदर्श शिक्षकाचा पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर दोन वेतनवाढ मिळत असते. त्यानुसार त्यांना वार्षिक ६० हजार रुपये मिळाले. आतापर्यंत त्यांना सहा ते सात लाख रुपये मिळाले. त्यांनी बनावट दस्तऐवजावर हा पुरस्कार प्राप्त करून सहा-सात लाखांनी फसवणूक केली. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध भादंविच्या १२०-ब, ४२०, ४६६, ४६७, ४६८, ४७१ या कलमांतर्गत खटला चालविण्यात यावा, अशी प्रार्थना दारव्हेकर यांनी आपल्या फौजदारी अर्जात केली आहे. न्यायालयात दारव्हेकर यांच्यावतीने अ‍ॅड. योगेशकुमार गोरले हे काम पाहत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Ideal teacher award for false documents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.