अखेर १२ कोटींच्या आयसीसीयूला मंजुरी
By Admin | Updated: March 2, 2016 03:12 IST2016-03-02T03:12:15+5:302016-03-02T03:12:15+5:30
मेडिकलमध्ये २०११ मध्ये तीन कोटी रुपये खर्चून तीन विविध विभागाचे प्रत्येकी एक अतिदक्षता विभाग (आयसीसीयू) होणार होते.

अखेर १२ कोटींच्या आयसीसीयूला मंजुरी
मेडिकल : २५०८ चौरस मीटर जागेवर होणार बांधकाम
नागपूर : मेडिकलमध्ये २०११ मध्ये तीन कोटी रुपये खर्चून तीन विविध विभागाचे प्रत्येकी एक अतिदक्षता विभाग (आयसीसीयू) होणार होते. परंतु बांधकामाच्या जागेला घेऊन तत्काळ निर्णय होऊ न शकल्याने तब्बल तीन वर्षे बांधकाम रखडले. अधिष्ठात्यांची सूत्रे डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्याकडे येताच त्यांनी या विभागाच्या बांधकामाचे महत्त्व लक्षात घेतले. जागेचे क्षेत्रफळ वाढवून सुधारित १२ कोटींचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडे (डीएमईआर) पाठविला. सोमवारी या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याने तीन महत्त्वाच्या विभागाच्या आयसीसीयूचा मार्ग मोकळा झाला आहे.
मध्यभारतातील सर्वात मोठे रुग्णालय असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) केवळ औषध वैद्यकशास्त्र विभागाचे आयसीसीयू आहे. मात्र, इतर विभागातील गंभीर रुग्णही येथेच ठेवले जात असल्याने हा विभाग नेहमीच फुल्ल असतो. अनेकवेळा बाहेरून येणाऱ्या गंभीर रुग्णांना खाटा नसल्याचे कारण सांगून खासगी रुग्णालयात पाठविण्याचे प्रकारही झाले. याची दखल घेत मेडिकल प्रशासनाने २०११ मध्ये पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजनेंतर्गत १५० कोटींच्या योजनेत ‘सर्जिकल इन्टेन्सिव्ह केअर युनिट’, ‘मेडिसीन इन्टेसिव्ह केअर युनिट’ आणि ‘नवजात शिशू इन्टेसिव्ह केअर युनिट’साठी ‘आयसीसीयू’च्या बांधकामाचा प्रस्ताव तयार केला. त्यावेळी हा प्रस्ताव १६९० चौरस मीटर जागेवर होणार होता. अपेक्षित खर्च ३ कोटी ४२ लाख २१ हजार रुपयांचा होता. विशेष म्हणजे, याला प्रशासकीय मंजुरी मिळाली होती. परंतु मेडिकलच्या २०० एकरच्या परिसरात या बांधकामासाठी जागा पहायला तब्बल तीन वर्षे लागली. तळमजल्यासह दोन मजल्याच्या या इमारतीचे हे बांधकाम पूर्वी रक्तपेढीच्या लिफ्टच्या बाजूला म्हणजेच नेत्र रोग विभागाच्या शस्त्रक्रिया गृहासमोर होणार होते. परंतु बांधकाम विभागाने या जागेला मान्यता दिली नव्हती. तेव्हापासून जागेची शोधाशोध सुरू होती. अखेर वॉर्ड क्र. ५ च्या मागील परिसरातील मोकळ्या जागेला बांधकाम विभागाने मंजुरी दिली. दरम्यान डॉ. निसवाडे यांनी अधिष्ठाता पदाची जबाबदारी सांभाळली. मेडिकलमध्ये येणाऱ्या रुग्णांची संख्या पाहता प्रस्तावित बांधकाम फार कमी जागेवर होत असल्याचे त्यांच्या निदर्शनात आले. त्यांनी २५०८ चौरस मीटरपर्यंत बांधकामाचे क्षेत्र वाढविले. १२ कोटी ६ लाख ४३ हजार रुपयांचा हा सुधारित प्रस्ताव डीएमईआरकडे पाठविला. हिवाळी अधिवेशनातही या प्रस्तावावर चर्चा झाली. अखेर सोमवारी याला मंजुरी मिळाल्याचे पत्र मेडिकलला प्राप्त झाले.
या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने, (मेडिकल) सांगितले, सुधारित प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविले असताना याचदरम्यान निविदा प्रक्रियेचे सोपस्कार पूर्ण करण्यात आले. परिणामी, यातील तीन निविदाही प्रसिद्ध झाल्या आहेत. यामुळे एप्रिल २०१६ पासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)