आयबीटीएम होणार आता मनपाचा ‘घरजावई’!
By Admin | Updated: January 28, 2016 03:08 IST2016-01-28T03:08:09+5:302016-01-28T03:08:09+5:30
शहरातील बस वाहतुकीची जबाबदारी सोपविण्यात आलेल्या स्टार बस आॅपरेटर वंश निमय इन्फ्राप्रोजेक्ट लिमिटेड

आयबीटीएम होणार आता मनपाचा ‘घरजावई’!
नागपूर : शहरातील बस वाहतुकीची जबाबदारी सोपविण्यात आलेल्या स्टार बस आॅपरेटर वंश निमय इन्फ्राप्रोजेक्ट लिमिटेड यांच्या मनमानी कारभारामुळे आधीच त्रस्त असलेल्या महापालिका प्रशासनाने आता इंटिग्रेटेड बस ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट (आयबीटीएम) या नवीन आॅपरेटरची नियुक्ती करण्याचा घाट घातला आहे. त्यांच्याकडे शहर बस वाहतुकीचे व्यवस्थापन व कर्मचाऱ्यांची भरती करण्याचे अधिकार राहणार आहे. त्यामुळे आता आयबीटीएम महापालिकेचा नवीन घरजावई होणार असल्याची चर्चा आहे.
आॅपरेटरला महापालिका दर महिन्याला १६ लाख ५९ हजार तसेच कर्मचाऱ्यांवर ५२ लाख ७ हजारांचा खर्च करणार आहे. विशेष म्हणजे इथेनॉलवर धावणाऱ्या ५५ ग्रीन बसेस व १५० डिझेल बसच्या व्यवस्थापनाची जबाबदारी या आॅपरेटरकडे सोपविण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
यात शहर बस चालविण्यासाठी दर महिन्याला २.८० कोटींचा तोटा गृहित धरण्यात आलेला आहे. नवीन आॅपरेटरच्या नियुक्ती केल्यानंतर महापालिकेला दरवर्षाला ३२ कोटी १२ लाखांचा तोटा सहन करावा लागणार आहे. यासाठी महापालिका सार्वजनिक वाहतून निधी कोष स्थापन करणार आहे. या प्रस्तावाला बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
धोरणात्मक बाब म्हणून या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे यांनी दिली. याबाबतचे संपूर्ण अधिकार परिवहन समितीला देण्यात आले आहेत.
या समितीचे बजेट स्वतंत्र राहणार आहे. त्यामुळे हा प्रस्ताव योग्य की अयोग्य, याबाबत प्रतिक्रिया देता येणार नाही. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या देखरेखीत प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यात महापालिकेचे नुकसान होणार असेल तर याची योग्य ती दखल घेतली जाईल, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)