मै जिंदगी का साथ निभाता चला गया..
By Admin | Updated: December 4, 2014 00:42 IST2014-12-04T00:42:38+5:302014-12-04T00:42:38+5:30
देव आनंद म्हणजे सदाबहार अभिनेता. आयुष्यभर स्वत:ची प्रतिमा चॉकलेट हिरो म्हणून यशस्वीपणे सांभाळणाऱ्या देवआनंद यांच्या विविधांगी भूमिकांनी त्यांचा काळ गाजला. त्यांची हेअरस्टाईल असो

मै जिंदगी का साथ निभाता चला गया..
‘डायमण्ड फॉरएव्हर अनफॉर्गेटेबल मेलोडीज’ : देवआनंदची सदाबहार गाणी
नागपूर : देव आनंद म्हणजे सदाबहार अभिनेता. आयुष्यभर स्वत:ची प्रतिमा चॉकलेट हिरो म्हणून यशस्वीपणे सांभाळणाऱ्या देवआनंद यांच्या विविधांगी भूमिकांनी त्यांचा काळ गाजला. त्यांची हेअरस्टाईल असो वा देहबोली, ती कायमच रसिकांच्या चर्चेत राहिली. जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श करणाऱ्या अनेक भूमिका त्यांनी अजरामर केल्यात. त्यांच्यावर चित्रित करण्यात आलेली गीते म्हणजे चित्रपट संगीताचा अमूल्य ठेवा आहेत. उत्कृष्ट संगीत, गुणवत्ता असणारे गायक आणि देवआनंद यांचा लक्षात राहणारा अभिनय. त्यांच्यावर चित्रित गीतांचे श्रवण म्हणजे पुन:प्रत्ययाचा आनंदच. अशाच गीतांचा एक गुलदस्ता नागपूरकरांची सायंकाळ सुरेल करणारा होता.
औरम एन्टरटेन्मेन्टतर्फे ‘डायमण्ड फॉरएव्हर अनफॉर्गेटेबल मेलोडीज’ या सुरेल कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी सायंटिफिक सभागृहात करण्यात आले. ‘ हर फिक्र को धुए मे उडाता चला गया...’ म्हणणाऱ्या देव आनंदने जिंदगी का साथ निभवतानाच निरोप घेतला तेव्हा त्याच्या चाहत्यांना दु:ख झाले. देव आनंदवर प्रेम करणाऱ्या रसिकांनी या कार्यक्रमाला गर्दी करून प्रत्येक गीताला दाद देत या सुरेल प्रवासाचा आनंद घेतला. मृणालिनी दस्तुरे यांच्या अभ्यासपूर्ण निवेदनाने रसिक देव आनंदच्या नव्या आणि जुन्या गीतांच्या स्मरणरंजनात रंगले. मयंक लखोटिया यांनी ‘तेरे मेरे सपने...’ या गीताने कार्यक्रमाचा प्रारंभ केला आणि त्यानंतर हा सुरेल प्रवास उंची गाठत गेला. यानंतर त्याने ‘दिल का भंवर करे पुकार, मै जिंदगी का साथ निभाता चला गया...’ आदी गीतांनी रंगत वाढविली. त्यानंतर सागर मधुमटके या गुणी गायकाने ‘फुलो के रंग से...’ या गीताने प्रारंभ केला पण सागर मात्र मंचावर दिसत नव्हता. प्रेक्षकही बुचकळ्यात पडले. सागर प्रेक्षकांमध्येच शांतपणे बसून गीत सादर करीत होता. प्रेक्षकांना अभिवादन करीत तो मंचावर आला आणि ‘ये दिल ना होता बेचारा.., गाता रहे मेरा दिल...’ आदी गीतांनी त्याने समा बांधला. सागर आणि किशोरकुमारची गीते हे रसिकांना आवडणारे समीकरण आहे, त्याचा प्रत्यय त्याला मिळणाऱ्या वन्समोअरने आला. त्याने श्रीनिधीसह कांची रे कांची आणि पन्नाकी तमन्ना है.. आदी गीते सादर करून रसिकांची दाद घेतली. मंजिरी वैद्यसह त्याने सादर केलेली ‘गाता रहे मेरा दिल...’ सादर करून मजा आणली. सर्वच गायकांनी तयारीने गीत सादर करून रसिकांनी जिंकले. मयंक लखोटियाने अनेक गीतांनी रसिकांची दाद घेतली तर श्रीनिधी आणि मंजिरीलाही वन्समोअरची दाद रसिकांनी दिली. कार्यक्रमात श्रीकांत सूर्यवंशी, पवन मानवटकर, सुभाष वानखेडे, पंकज यादव, रिंकू निखारे, राजा राठोड व प्रकाश चव्हाण या वादकांनी साथसंगत केली. श्रीकांतला ‘मोसे छल..’ या गीताच्या तबलावादनासाठी रसिकांनी खास दाद दिली. (प्रतिनिधी)