लेकाच्या पराक्रमाने सद्गदित झाली आई
By Admin | Updated: January 26, 2016 03:27 IST2016-01-26T03:27:24+5:302016-01-26T03:27:24+5:30
भारतीय नौदलाचे व्हाईस अॅडमिरल अशोक सुभेदार यांना परम विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात येत आहे. ते

लेकाच्या पराक्रमाने सद्गदित झाली आई
नागपूर : भारतीय नौदलाचे व्हाईस अॅडमिरल अशोक सुभेदार यांना परम विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात येत आहे. ते नागपूरकर असल्याने संपूर्ण नागपूरकरांना त्यांचा अभिमान आहेच. परंतु आपल्या लेकाच्या या पराक्रमाने त्यांच्या आई सद्गदित झाल्या आहेत. यावेळी त्यांनी मुलांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. त्याच्या वडिलांच्या प्रेरणेमुळेच तो आज देशाच्या सेवेसाठी सैन्यात असल्याचे त्यांनी सांगितले.
शैलजा सुभेदार या आज ८० वर्षांच्या आहेत. त्यांचे कुटुंब हे समाजकारणात सक्रिय आहेत. त्या स्वत: सरस्वती मंदिर रेशीमबाग या संस्थेच्या अध्यक्ष असून या संस्थेत त्या मागील ५२ वर्षांपासून काम करीत आहेत. त्यांचे पती विश्वनाथ सुभेदार हे विधान परिषदेचे सदस्य होते. तसेच नाशिक येथील भोसला मिलिटरी स्कूलचे ते २० वर्षे अध्यक्ष राहिलेत. त्यांना दोन मुलं आणि एक मुलगी आहे. अशोक सुभेदार हे दुसऱ्या क्रमांकाचे आहेत. अशोक यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण हडस विद्यालयात झाले. तर हिस्लॉप कॉलेजमधून त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर अमरावती विद्यापीठात त्यांनी इंजिनियरिंगला प्रवेश घेतला. इंजिनियरिंग करीत असतानाच त्यांची नौदलात नियुक्ती झाली. त्यावेळी त्यांना वडील दिवंगत विश्वनाथ सुभेदार यांनी खूप प्रोत्साहित केले. विश्वनाथ हे स्वत: भोसला मिलिटरी स्कूलचे अध्यक्ष होते. त्यामुळे त्यांचा एक तरी मुलगा देशाची सेवा करण्यासाठी सैन्यात जावा अशी त्यांची खूप इच्छा होती. अशोक यांना नौदलात जाण्याची संधी मिळताच विश्वनाथ यांना खूप आनंद झाला. त्यांनी अशोक यांना प्रोत्साहित केले. पैसे तर कुणीही कमावेल परंतु देशाची सेवा करण्याची संधी प्रत्येकाला मिळत नाही. ही संधी तू घालवू नकोस, असे त्यांनी मुलाला तेव्हा समजावले. त्यांच्या प्रेरणेमुळेच आज अशोक नौदलात राहून देशाची सेवा करीत आहे. एकेक पायरी चढत त्याने हे पद प्राप्त केले असल्याचे शैलजा यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
सुनेचेही कौतुक
४अशोकच्या या यशात त्याची पत्नी रोहिणी हिची खूप साथ मिळाली. सैन्याची नोकरी म्हटली की, वारंवार बदली ही आलीच. अशा वेळी पत्नीची साथ असणे खूप महत्त्वाचे असते. अशोकला रोहिणीची भक्कम साथ मिळाली, त्यामुळेच तो आज हे यश प्राप्त करू शकला, असे अशोक सुभेदार यांच्या आई शैलजा सुभेदार यांनी स्पष्ट करीत सुनेचे कौतुक केले.