सीएमच्या भेटीसाठी हैदराबाद हाऊस ‘फुल्ल’
By Admin | Updated: May 4, 2015 02:26 IST2015-05-04T02:26:47+5:302015-05-04T02:26:47+5:30
नागपूरकर मुख्यमंत्री नागपूरच्याच नागरिकांना सहज उपलब्ध होतो, त्यांच्याशी भेट घेतो, निवेदन स्वीकारतो

सीएमच्या भेटीसाठी हैदराबाद हाऊस ‘फुल्ल’
नागपूर : नागपूरकर मुख्यमंत्री नागपूरच्याच नागरिकांना सहज उपलब्ध होतो, त्यांच्याशी भेट घेतो, निवेदन स्वीकारतो आणि संवादही साधतो,असे सुखावणारे चित्र रविवारी मुख्यमंत्र्यांच्या सचिवालयी (हैदराबाद हाऊस) दिसून आले. मुख्यमंत्र्याना भेटण्यासाठी झालेल्या गर्दीमुळे हैदराबाद हाऊस फुल्ल झाले होते.
नागपूरकर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर मुख्यमंत्र्यांचे सचिवालय नागपुरातही सुुरू करावे, अशी मागणी जोर धरू लागली होती. त्याची दखल घेत एरवी फक्त हिवाळी अधिवेशन काळातच सुरू राहणारे सचिवालय फडणवीस यांनी पुन्हा सुरू केले. स्थानिक नागरिकांना भेटता यावे हा सचिवालय सुरू करण्यामागचा उद्देश होता. रविवारी या उपक्रमाला सुरुवात झाली.
दरम्यान मुख्यमंत्री निवेदन स्वीकारणार असल्याची बातमी पसरताच शेकडो नागरिकांनी त्यांना भेटण्यासाठी हैदराबाद हाऊस गाठले. काही वेळातच तेथे लांबच लांब रांगा लागल्या. शेतकरी, महिला कामगार, सेवानिवृत्त, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि तरुणांचा समावेश होता. काही अपंगही होते तर काही लहान मुलेही आली होती. दु. ४.२० वा.पासून फडणवीस यांनी निवेदने स्वीकारण्यास सुरुवात केली. तब्बल ८०० पेक्षा अधिक लोकांनी त्यांची भेट घेतली. त्यांच्याशी संवादही साधला. उपस्थित अधिकाऱ्यांना प्रश्न निकाली काढण्याच्या सूचनाही दिल्या. त्यांच्यासोबत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा व पोलीस आयुक्त शारदाप्रसाद यादव होते.
आपल्या प्रश्नांची राज्याचा मुख्यमंत्री थेट दखल घेतो हे पाहून नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होते.(प्रतिनिधी)