विवाहितेच्या छळात पतीला कारावास
By Admin | Updated: December 11, 2015 03:52 IST2015-12-11T03:52:22+5:302015-12-11T03:52:22+5:30
एका विवाहितेच्या मृत्यू प्रकरणात शारीरिक व मानसिक छळाचा गुन्हा सिद्ध झाल्याने अतिरिक्त सत्र न्यायाधीश मोहम्मद सादिक ...

विवाहितेच्या छळात पतीला कारावास
न्यायालय : हुंडाबळी, खुनाच्या आरोपातून निर्दोष मुक्त
नागपूर : एका विवाहितेच्या मृत्यू प्रकरणात शारीरिक व मानसिक छळाचा गुन्हा सिद्ध झाल्याने अतिरिक्त सत्र न्यायाधीश मोहम्मद सादिक यांच्या न्यायालयाने आरोपी पतीला तीन वर्षे सश्रम कारावास आणि अडीच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
न्यायालयाने भादंविच्या कलम ३०४ -ब (हुंडाबळी), ३०२ (खून) आणि ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त) या आरोपातून आरोपीची निर्दोष सुटका केली. परेश शालिकराम जिचकार (३४), असे आरोपी पतीचे नाव असून तो काटोल तालुक्यातील अंजनगाव येथील मूळ रहिवासी आहे. दुर्गा परेश जिचकार, असे मृत विवाहितेचे नाव होते.
काटोल तालुक्यातील कुकडी पांजरा येथील रहिवासी शंकर नारायण गेडाम यांची मुलगी दुर्गा हिचा विवाह परेशसोबत ११ फेब्रुवारी २००७ रोजी झाला होता. आपण सिव्हिल लाईन्स नागपूर येथील आयसीआयसीआय बँकेत नोकरी करीत असल्याचे परेशने लग्नापूर्वी सांगितले होते. प्रत्यक्षात तो बँकेत कामावर जात नव्हता. प्रारंभी पती-पत्नी मानेवाडा रोड येथील जवाहरनगर येथे भाड्याने राहत होते. त्यानंतर ते विश्वकर्मानगर येथील संजय बंडे यांच्या घरी भाड्याने राहण्यास आले होते.
सासऱ्याने शेत विकल्याचे समजताच परेशने दुर्गाला माहेरहून दोन लाख रुपये आणण्याचा तगादा लावला होता. पैशासाठी तो तिचा मानसिक व शारीरिक छळ करायचा. मुलीचा छळ थांबावा म्हणून शंकर गेडाम यांनी आपले मोठे जावई बाळनाथ मानकर यांच्या हाताने परेशला देण्यासाठी १ लाखाचा चेक पाठविला होता. तरीही त्याने दुर्गाचा छळ करणे थांबवले नव्हते. पुन्हा त्याने २० हजाराची मागणी केल्याने गेडाम यांनी दीड तोळ्याचा सोन्याचा गोफ त्याला गहाण ठेवण्यास दिला होता. आरोपीची पैशाची मागणी वाढत होती. त्याने छळ थांबवला नव्हता. अखेर पतीकडून होणाऱ्या छळाला कंटाळून दुर्गाने विष प्राशन केले होते.
भांडे प्लॉट येथील नेरकर इस्पितळात तिचा मृत्यू झाला होता. अजनी पोलिसांनी शंकर गेडाम यांच्या तक्रारीवरून हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला होता. भादंवि ३०२, ३०६ अन्वये पर्यायी कलमान्वये आरोप निश्चित करण्यात आले होते. न्यायालयात सरकारच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील रवींद्र भोयर आणि आरोपीच्या वतीने अॅड. ए. आर. इटनकर यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)