शिकारी दारात; यंत्रणा कोमात!
By Admin | Updated: November 22, 2015 02:57 IST2015-11-22T02:57:10+5:302015-11-22T02:57:10+5:30
वाघाच्या शिकारीसाठी कुख्यात ‘बहेलिया टोळी’ पुन्हा विदर्भातील जंगलाच्या दारात पोहोचली आहे. त्यासंबंधी ‘वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो (डब्ल्यूसीसीबी) ...

शिकारी दारात; यंत्रणा कोमात!
‘हाय अलर्ट’ : ‘अँटी पोचिंग स्क्वॉड’ व ‘मोबाईल स्क्वॉड’ केवळ नावाला
जीवन रामावत नागपूर
वाघाच्या शिकारीसाठी कुख्यात ‘बहेलिया टोळी’ पुन्हा विदर्भातील जंगलाच्या दारात पोहोचली आहे. त्यासंबंधी ‘वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो (डब्ल्यूसीसीबी) व राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) अलीकडेच संपूर्ण राज्यात ‘हाय अलर्ट’ जारी केलाआहे. परंतु त्याच वेळी वाघाच्या संरक्षणाची धुरा असलेली नागपूर वन विभागाची सुरक्षा यंत्रणाच कोलमडून पडली आहे.
शिकाऱ्यांशी दोन हात करण्यासाठी स्थापन करण्यात आलेले ‘अँटी पोचिंग स्क्वॉड’ व ‘मोबाईल स्क्वॉड’ केवळ नावापुरते शिल्लक आहेत. यामुळे वन विभाग हतबल झाला असून, वाघाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे, नागपूर विभागीय कार्यालयात एक ‘अॅन्टी पोचिंग स्क्वॉड’ व दोन ‘मोबाईल स्क्वॉड’ आहेत. परंतु यापैकी ‘अँटी पोचिंग स्क्वॉड’ व एका ‘मोबाईल स्क्वॉड’ला अधिकारीच नसून, वन परिक्षेत्र अधिकारी (आरएफओ) वाघे हे एकटेच दोन्ही ‘मोबाईल स्क्वॉड’ व उमरेड (पाचगाव) येथील रेंजचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत आहेत. त्यामुळे त्यांना मोबाईल स्क्वॉडकडे लक्ष देण्यासाठी सवडच मिळत नसून, पाचगाव रेंजमध्ये व्यस्त झाले आहेत. शिवाय ‘अँटी पोचिंंग स्क्वॉड’चे सहायक वनसंरक्षक (एसीएफ) बी. एच. वीरसेन यांची अलीकडेच प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी अजूनपर्यंत कुणालाही पाठविण्यात आलेले नाही.
दक्षता विभागाची गस्त
नागपूर वन विभागातर्फे सर्व उपवनसंरक्षक अधिकाऱ्यांना ‘हाय अलर्ट’ ची माहिती देउन त्यांना गस्त वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र त्याचवेळी नागपुरातील ‘अँटी पोचिंग स्क्वॉड’ व ‘मोबाईल स्क्वॉड’ ला अधिकारी नसल्याने फार मोठी समस्या निर्माण झाली आहे. तरी दक्षता विभाग शिकाऱ्यांपासून वाघाची सुरक्षा करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. उपलब्ध मनुष्यबळाच्या भरवशावर गस्त केली जात आहे.
- केवल डोंगरे,
विभागीय वन अधिकारी (दक्षता)