लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीत जागोजागी अवैध बॅनर्स-होर्डिंग्ज दिसून येतात. अगदी गल्लीच्या कार्यकर्त्यापासून ते दिल्लीच्या नेत्यापर्यतचे बॅनर्स वाट्टेल तेथे लावलेले असतात. मात्र, त्यांच्यावर फारशी कारवाई होताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेकडून दाखल तक्रारींवरून एका इस्पितळाविरोधात अवैध बॅनर लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. मात्र सद्यःस्थितीत शहरात शेकडो अवैध बॅनर्स-होर्डिंग्ज लागलेले असताना केवळ एकच गुन्हा दाखल होणे ही बाबच मनपाच्या एकूण कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे. संबंधित गुन्हा गिट्टीखदान पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
गोरेवाडा मार्गावरील सिनर्जी हॉस्पिटलला अवैध बॅनर लावणे महागात पडले. संबंधित इस्पितळाकडून मानकापूर चौक ते गोरेवाडा या मार्गावर पलोटी शाळेजवळील नाल्यावर जाळीवर अवैध बॅनरबाजी करण्यात आली होती. याची माहिती मनपाच्या मंगळवारी झोनच्या अधिकाऱ्यांना मिळाली. मनपाच्या पथकाने तेथे जाऊन पाहणी केली असता ८ फूट बाय ७फुटांचे होर्डिंग कम बॅनर तेथे लावण्यात आल्याची बाब स्पष्ट झाली. ते होर्डिंगवजा बॅनर दोन तासांच्या आत काढण्यात आले. त्यानंतर मंगळवारी झोनचे सहायक आयुक्त अशोक पसरराम गराटे यांनी गिट्टीखदान पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी सिनर्जी हॉस्पिटलच्या व्यवस्थापकाविरोधात महाराष्ट्र मालमत्ता विरुपणास प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मनपाच्या या कारवाईचे स्वागत करण्यात येत आहे. मात्र, मनपाच्या पथकांना शहरातील इतर अवैध होर्डिंग्ज व बॅनर्स दिसत नाहीत का? व त्यांच्यावर कारवाई कधी होणार, असे सवाल उपस्थित होत आहेत.
मनपा अधिकाऱ्यांचे इतर होर्डिंग्ज-बॅनर्सला अभय का?नागपूर शहरातील चौक, वर्दळीच्या रस्त्यांवर, ट्रॅफिक सिग्नल, विद्युत पोल, ट्रान्स्फॉर्मर आदींवर जागोजागी अवैध होर्डिंग व बॅनरची भरमार आहे. यावर महापालिका प्रशासनाकडून कुठलीही कारवाई होत नसल्याचे चित्र आहे. अनेक बॅनर्स तर अगदी सिग्नलवर लागलेले असतात. त्यामुळे अनेकदा व्हिजन ब्लॉक होते व त्यातून अपघातदेखील होतात. मनपाकडून मोठमोठाले दावे करण्यात येतात. मात्र अधिवेशन, व्हीआयपी नेत्यांचे दौरे, सणासुदीचे दिवस तसेच राजकीय नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त अवैध होडिंग्ज व बॅनर्सचे अक्षरशः पीक येते. त्याकडे मनपा अधिकाऱ्यांकडून सोईस्कर दुर्लक्ष होते.
उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे गुन्हा२०१७ साली उच्च न्यायालयाने अनधिकृत होर्डिंग व बॅनर्ससंदर्भात निर्णय दिला होता. अशी बॅनरबाजी करणाऱ्यांविरोधात कारवाई करत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अवैध जाहिराती, घोषणा, फलक, होडिंग व पोस्टर्स, तोरण हटविण्यासंदर्भात वेळोवेळी निर्देश दिले आहेत. त्यानुसारच ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.