लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंतप्रधान कार्यालयाने आदेश दिल्यानंतरही शांतिवन चिचोलीचा प्रकल्प दोन वर्षे लोटल्यानंतरही अपूर्णच आहे. त्यामुळे पीएमओ कार्यालयाच्या आदेशालाही राज्य शासन व प्रशसनाकडून केराची टोपली दाखवण्यात आल्याचा प्रकार दिसून येत आहे. परिणामी भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेचा मुळगाभा ज्यावर सर्वप्रथम टाईप केला त्या टाईपराईटरसह बाबासाहेबांनी प्रत्यक्ष वापरलेल्या शेकडो ऐतिहासिक वस्तू पुन्हा एकदा नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
कळमेश्वर रोडवरील फेटरी जवळ चिचोली गावात शांतिवन चिचोली हा प्रकल्प आहे. येथे बुद्धिस्ट सेमिनरी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर वस्तु संग्रहालय उभारले जात आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या मदतीने हा प्रकल्प उभारला जात आहे. संग्रहालयासह, सभागृह, मेडिटेशन सेंटर आदींच्या इमारती उभा झाल्या आहेत. परंतु अंतर्गत कामे बरीच शिल्लक आहे.
१४ एप्रिल २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात येणार होते. त्यापूर्वी तत्कालीन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आणि पीएमचे अधिकारी यांनी शआंतिवनाला भेट दिली होती. तेव्हा संग्रहालयासह बरीच कामे शिल्लक असल्याचे दिसून आले. त्यामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. प्रकल्पाची कामे सहा महिन्यात पूर्ण करा. त्यासाठी निधीची कुठलीही कमतरता पडू देऊ नका, त्यानंतरह पंतप्रधान याचे लोकार्पण करतील, असे स्पष्ट निर्देश पीएमओ कार्यालयाने दिले. यादृष्टीने केंद्रीय मंत्री अर्जून मेघवाल यांनी तीन वेळा शांतिवन चिचोलीला भेट देऊन पाहणी केली. आता दोन वर्षे लोटली आहेत. परंतु परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. प्रकल्पच नव्हे तर वस्तु संग्रहालयातील अंतर्गत कामही शिल्लक आहे.
रासायनिक प्रक्रिया होऊन लोटली चार वर्षेयेथील शेकडो वस्तू नष्ट होण्याचा धोका असल्याने त्यावर मध्यवर्ती संग्रहालयात रासायनिक प्रक्रिया करण्यात आली. त्याला आता चार वर्षे लोटली आहेत. या वस्तू शांतिवनातच एका खोलीत ठेवली आहेत. चार वर्षाचा कालावधी मोठा आहे. या वस्तू तातडीने संग्रहालयात योग्य पद्धतीने सुरक्षित ठेवली गेली नाही तर त्या पुन्हा नष्ट होण्याचा धोका आहे.
"वस्तु संग्रहालयाची इमारत पूर्ण झाली असली तरी अंतर्गत कामासाठी १४ कोटीची गरज आहे. शासनाला तसा प्रस्ताव पाठवलेला आहे. पीएमओ कार्यालयाने आदेश जारी केले. केंद्रीय मंत्र्यांनी तीन वेळा भेट दिली. राज्य शासनाने आश्वासन दिले परंतु दोन वर्षे लाेटली तरी संग्रहालयाचे काम तसेच आहे. संग्रहालय तातडीने पूर्ण होणे आवश्यक आहे, अन्यथा बाबासाहेबांच्या वस्तुंवर करण्यात आलेली रासायनिक प्रक्रिया व्यर्थ ठरेल."- संजय पाटील , कार्यवाहन शांतिवन चिचोली