नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथील दोन्ही प्रशासकीय अधिकारी रजेवर गेल्याने शेकडो कर्मचार्यांशी संबंधित आर्थिक व्यवहार ठप्प पडले आहेत. याचा सर्वाधिक फटका मेडिकलमध्ये नव्याने रुजू झालेल्या परिचारिकांना बसला आहे. या परिचारिकांची मार्च व एप्रिल या दोन महिन्यांची बिले मंजुरीअभावी लटकली आहेत. मेडिकलचा व्याप पाहता रुग्णालय आणि कॉलेज हे दोन विभाग स्वतंत्र करून त्यांच्यासाठी दोन प्रशासकीय अधिकारी नियुक्त करण्यात आले. या दोन विभागांच्या प्रशासकीय कारभारात सरमिसळ होऊ नये, गोंधळ उडू नये आणि एकावरच कामाचा ताण येऊ नये, या उद्देशाने हे विभाग स्वतंत्र करण्यात आले. त्यानुसार महाविद्यालयाच्या प्रशासकीय कारभाराची सूत्रे विलास खनगन यांच्याकडे आहे, तर रुग्णालयाच्या प्रशासकीय कारभाराची यंत्रणा ओ. एस. खडसे हाताळतात. या दोन्ही विभागांशी निगडित सर्व आर्थिक व्यवहार, बिले, पगार पत्रके ज्या त्या विभागातील प्रशासकीय अधिकार्यांच्या स्वाक्षरीशिवाय मंजूर होत नाहीत. त्यांची स्वाक्षरी झाल्याशिवाय बिलाची रक्कम कर्मचार्यांच्या खात्यात जमा होत नाही. हा प्रशासकीय शिस्तीचा भाग आहे. अशा परिस्थितीत खडसे आणि खनगन हे दोन्ही प्रशासकीय अधिकारी रजेवर गेले आहेत. खडसेंनी रजेवर जाताना त्यांच्याकडील चार्ज एल. आगलावे यांच्याकडे सुपूर्द केला होता. मात्र, तेही गेल्या आठवड्यापासून रजेवर आहेत. खनगन यांनी सुटीवर जाताना त्यांच्याकडील चार्ज कुणाकडेही सुपूर्द केला नसल्याची माहिती आहे. बिलांच्या मंजुरीसाठी स्वाक्षरी करणारा एकही अधिकारी या दोन्ही विभागांमध्ये नसल्याने कर्मचार्यांचे आर्थिक व्यवहार ठप्प पडले आहेत. याचा सर्वाधिक फटका नव्याने रुजू झालेल्या १५० स्टाफ परिचारिकांना सोसावा लागत आहे. (प्रतिनिधी)
मेडिकलमधील शेकडो बिले लटकली
By admin | Updated: May 11, 2014 01:30 IST