संवेदनेतून जागवा माणुसकीची ‘मशाल’

By Admin | Updated: August 11, 2015 03:49 IST2015-08-11T03:49:48+5:302015-08-11T03:49:48+5:30

शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा ज्वलंत प्रश्न आहे. यावर राजकारण करणे, टीका करणे हे काम विरोधी पक्षांनी करावे.

Humanity's 'torch' awakens sensation | संवेदनेतून जागवा माणुसकीची ‘मशाल’

संवेदनेतून जागवा माणुसकीची ‘मशाल’

नाना पाटेकर यांचे भावुक आवाहन : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना मदत
नागपूर : शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा ज्वलंत प्रश्न आहे. यावर राजकारण करणे, टीका करणे हे काम विरोधी पक्षांनी करावे. परंतु एक माणूस म्हणून जगताना हालअपेष्टेत दिवस काढणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आधार देणे जास्त महत्त्वाचे आहे. हे सर्वच आपल्या सामाजिक कुटुंबाचा भाग आहे व त्यांना स्थैर्य देण्यासाठी संवेदनेतून माणुसकीची ‘मशाल’ जागवलीच पाहिजे असे मत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केले. ‘जनमंच’तर्फे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी ‘एका साध्या सत्यासाठी...’ या आर्थिक सहायता कृतज्ञता उपक्रमाचे डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात सोमवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी भावुक झालेल्या नाना यांच्या आवाहनाने संपूर्ण सभागृहदेखील हळवे झाले.
शेतकरी आत्महत्यांवर बैठका व चर्चा फार होतात. परंतु चर्चा व संवाद यात वेळ न घालवता संवेदनशील मनाचे कलाकार नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी समोर येत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी निधी जमा केला व तो त्यांना सुपूर्ददेखील केला. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित कार्यक्रमाला मकरंद अनासपुरे, शेतकरी नेते किशोर तिवारी, ‘जनमंच’चे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर, दिग्दर्शक हरीश इथापे, ज्येष्ठ पत्रकार श्याम पेठकर, नितीन नेरुरकर, शरद शेलार, ‘जनमंच’चे सचिव राजीव जगताप हे व्यासपीठावर उपस्थित होते.
मुळात आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबय्ीाांसाठी असे कार्यक्रम करावे लागतात यासारखे हे अतिशय दुर्दैवी आहे. शासनकर्त्यांच्या उणिवा आहेत. परंतु त्यांनी मदतदेखील केली आहे. शासनासोबतच आपल्या सर्वांचीदेखील अन्नदात्याप्रति जबाबदारी आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी जनचळवळ उभी रहायला हवी. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलामुलींसाठी आधार बनण्याची गरज आहे असे प्रतिपादन नाना पाटेकर यांनी केले.
शेतकऱ्यांबाबत समाजात असलेली मानसिकता बदलली गेली नाही तर ती अराजकतेची नांदी ठरेल. देशभर जसा ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करण्यात येतो, त्याप्रमाणे शेतकरी दिवस साजरा व्हायला हवा असे आवाहन मकरंद अनासपुरे यांनी केले. श्याम पेठकर व किशोर तिवारी यांनी शेतकऱ्यांच्या वेदनांचे प्रत्यक्ष वर्णनच यावेळी केले. अ‍ॅड.अनिल किलोर यांनी प्रस्तावना मांडली. संचालक अजेय गंपावार यांनी केले तर हरीश इथापे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या शेवटी म.म.देशपांडे यांनी रचलेल्या गीताने आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.(प्रतिनिधी)

६१ शेतकरी कुटुंबांना आर्थिक साहाय्य
४यावेळी वर्धा व यवतमाळ जिल्ह्यातील ६१ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना प्रत्येकी १५ हजार रुपयांची मदत करण्यात आली. उपस्थित असलेल्या ६१ शेतकरी कुटंबीयांपैकी कविता सिडाम, अपर्णा मालीकर, सुनीता पेंडोरे, उषा आष्टेकर, रेखा गुरनुले आणि नंदा भेंडारे यांना नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरेंच्या हस्ते धनादेश देण्यात आले. ‘जनमंच’तर्फे अकोला, बुलडाणा, वाशीम व अमरावती जिल्ह्यातदेखील अशाच प्रकारचा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
नाना, मकरंद झाले भावुक
४शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचे दु:ख पाहून व त्यांची व्यथा ऐकून नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे दोघेही भावुक झाले. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची पत्नी कविता सिडाम यांना मंचावर भावना व्यक्त करायला बोलविण्यात आले. परंतु त्यांची दीड वर्षांची चिमुकली मुलगी रडायला लागली. अशा वेळी तिला शांत करण्यासाठी तिचे वडील नाहीत या भावनेतून नाना व मकरंद यांचे डोळे भरून आले. व्यासपीठाच्या मागे नाना पाटेकर यांनी सिडाम यांच्याशी संवाद साधला व ‘तू माझी मुलगीच आहे’ या शब्दांत त्यांना दिलासा दिला.
शर्ट २०००चा अन् हेक्टरी मदत १५००ची
४मकरंद अनासपुरे यांनी अतिशय समर्पकरीत्या शेतकऱ्यांच्या वेदना उपस्थितांसमोर मांडल्या. मी भारतातून ‘इंडिया’त गेलो असलो तरी भारताशी माझी नाळ तुटलेली नाही. म्हणूनच या आत्महत्या पाहून मला अपराधी वाटले व अपराधाचे पाप फेडण्यासाठीच आर्थिक साहाय्य करण्यासाठी पुढाकार घेतला. सारे भारतीय आपले बांधव असे म्हणतो, मग शेतकरी काय कुटुंबाच्या बाहेरचा आहे का असा सवाल त्यांनी केला. शहरामध्ये लोक १५ हजारांचा जोडा व २ हजारांचा शर्ट अगदी सहजपणे विकत घेतात. परंतु शेतकऱ्याला मात्र हेक्टरी केवळ १५०० रुपयांची मदत मिळते यावर त्यांनी मार्मिकपणे बोट ठेवले.
उपेक्षेतून विद्रोह का नाही करणार?
४पराकोटीची उपेक्षा, वंचितावस्था आणि कमालीचे दारिद्र्य यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलाने जंगलाचा रस्ता आणि हाती बंदुक धरली तर ते चुकीचे ठरणार नाही. एखाद्याच्या जगण्याचा अधिकारच हिरावून घेतला जाणार असेल तर तो दुसरे काय करणार काय असा प्रश्न नाना पाटेकर यांनी यावेळी उपस्थित केला.
फडणवीस भला माणूस
४नाना पाटेकर यांनी यावेळी भ्रष्टाचारी मंत्र्यांवरदेखील प्रहार केला. शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचे दु:ख भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध न झालेल्या व भरपूर पैसा असलेल्या माजी मंत्र्यांना दिसत नाही काय असा सवाल त्यांनी केला. मी कुठल्या पक्षाचा समर्थक नाही. मला त्याची गरजही नाही. पण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा चांगला माणूस वाटतो. त्यांच्याकडून मला खूप अपेक्षा आहेत असे ते म्हणाले.

Web Title: Humanity's 'torch' awakens sensation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.