बंद घरातून आढळली जमिनीत पुरलेली मानवी हाडे

By Admin | Updated: May 21, 2014 01:11 IST2014-05-21T01:11:26+5:302014-05-21T01:11:26+5:30

भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात एका बंद घरातून जमिनीत पुरलेली मानवी हाडे सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. सुमारे तीन महिन्यांपासून ते घर बंद आहे आणि

Human bones buried in closed soil from the house | बंद घरातून आढळली जमिनीत पुरलेली मानवी हाडे

बंद घरातून आढळली जमिनीत पुरलेली मानवी हाडे

वर्षभरापासून घरमालक बेपत्ता : सहा फुटाच्या खड्ड्यात दडले आहे रहस्य!

तुमसर, (जि. भंडारा) : भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात एका बंद घरातून जमिनीत पुरलेली मानवी हाडे सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. सुमारे तीन महिन्यांपासून ते घर बंद आहे आणि घरमालक काशीराम एक वर्षापासून बेपत्ता. मात्र काशीरामच्या बेपत्ता झाल्याची कुठलीही तक्रार पोलिसांत नाही. तीन महिन्यांपर्यंत काशीरामची पत्नी तेथेच राहत होती. आता ती रायपूरला आहे. जमिनीतून आढळलेली हाडे एक वर्षापूर्वीची असल्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तविल्याने ‘ती’ हाडे कुणाची आणि कुठे आहे काशीराम, या दोन प्रश्नांनी पोलिसांच्या डोक्याच्या ताप वाढविला आहे. या प्रकरणाचा उलगडा काशीरामची पत्नीच्या बयाणावरून होणार असल्याने तिला आणण्यासाठी पोलीस पथक रायपूरकडे रवाना झाले आहे. देव्हाडी येथे काशीराम कुकडे याचे तुमसर (रोड) रेल्वे स्थानकाजवळील तलाव परिसरात शेत आहे. त्या शेतातच आठ वर्षापूर्वी त्याने लहानसे घर बांधले होते. या घराजवळ इतर घरे नाहीत. सुमारे वर्षभरापासून काशीराम बेपत्ता असल्याचे सांगितले जाते. त्याची पत्नी शीला तेथे राहायची. आता तीन महिन्यांपासून तीही आपल्या मुलीकडे रायपूर (छत्तीसगड) येथे राहते. घर कुलूपबंद स्थितीत आहे. तीन दिवसांपूर्वी हे घर खचल्यामुळे त्याठिकाणी खड्डा पडला. या खड्ड्यातून मोकाट कुत्र्यांनी घरातील कपडे बाहेर काढले. तलाव परिसरात गेलेल्या नागरिकांनी घरात डोकावून पाहिले असता सहा फुटाचा खोदलेला खड्डा मातीने बुजविलेल्या स्थितीत दिसून आला. ही वार्ता गावात पसरताच नागरिकांनी काशीरामच्या घरासमोर गर्दी केली. या घटनेची माहिती नागरिकांनी तुमसर पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर मंगळवारी सकाळी ११ वाजता तंटामुक्त गाव समितीचे सदस्य, ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत खड्डा खोदणे सुरु केले. दीड फुटावर हाताची दोन सरळ हाडे व पंजाच्या हाडांचा सापळा तसेच डोक्याचे केस आढळून आले. ही हाडे वर्षभरापासून पुरलेली असावी, असे पोलिसांचे म्हणणे आहे. साडेतीन फूट खोल व आठ फूट लांब असा खड्डा खोदण्यात आला. परंतु मृतदेहाचा सांगाडा आढळला नाही. जमिनीत पुरलेला मृतदेह बाहेर काढून काही दिवसानंतर मृतदेहाच्या अवयवांची इतरत्र विल्हेवाट लावण्यात आली असावी, अशीही शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. ही हाडे मानवी शरीराची असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मकरंद वाडीभस्मे यांनी सांगितले. हाडे आणि काशीरामच्या मुलाच्या रक्ताचे नमुने नागपूर येथे फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात येणार असल्याचे उपविभागीय अधिकारी आनंद भोईटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. दरम्यान, काशीरामचा मेहुणा मोतीराम बुद्धे, मुलगा सुरज कुकडे (१८) याला चौकशीकरिता ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र त्यांच्याकडून पोलिसांना अद्याप ठोस माहिती मिळालेली नाही. यासंदर्भात तुमसरचे उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद भोईटे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, काशीरामची पत्नी शीला कुकडे (३६) हिने तीन महिन्यांपूर्वी घर सोडले. दीड महिना ती खैरलांजीला आपल्या भावाकडे होती आणि आता ती रायपूर येथे मुलीकडे आहे. तिच्याशी पोलिसांनी भ्रमणध्वनीवर संपर्क केला असून तिला तुमसरला आणण्यात येईल. काशीराम कुकडे याचे लग्न तुमसर तालुक्यातील खैरलांजी येथील रहिवासी शीला हिचेशी २० वर्षांपूर्वी झाले होते. तो घरबांधणीची कामे करायचा. वर्षभरापूर्वी तो घरुन अचानक गायब झाला, अशी माहिती काशीरामची सावत्र आई शकुंतला कुकडे (७०) हिने दिली. पत्नी शीलाने यासंदर्भात पोलिसात तक्रार दिली नाही. ९ मार्च रोजी शीला देव्हाडी येथे एका लग्नासाठी आली असता शकुंतलाने तिला पुन्हा काशीरामबद्दल विचारले. मात्र तो अद्याप बेपत्ता असल्याचे तिने सांगितले. घटनास्थळावर उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद भोईटे, पोलीस निरीक्षक किशोर गवई ठाण मांडून आहेत. याप्रकरणी अद्याप गुन्हे दाखल करण्यात आलेले नसून काही ठोस पुरावा सापडताच आरोपींना अटक करुन गुन्हे दाखल करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक अशोक तिवारी करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी) खड्ड्यातून सापडलेली हाडे ही मानवाची असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. हाडे आणि काशीरामच्या मुलाचे रक्त नमुने डीएनएसाठी पाठविण्यात आले आहेत. काशीरामची पत्नी शीला हिच्या बयाणावरुन सत्य बाहेर येण्याची शक्यता आहे. तपास सुरु असून सद्यस्थितीत अधिक भाष्य करणे योग्य नाही. -आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी, तुमसर.

Web Title: Human bones buried in closed soil from the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.