लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जुन्या वाहनांसाठी 'हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट' (एचएसआरपी) बसवण्याची अंतिम मुदत १५ ऑगस्ट रोजी संपत आहे, तरीही राज्यातील ८० टक्के वाहनांवर अजूनही जुन्याच नंबरप्लेट आहेत. तब्बल दोन कोटींपेक्षा जास्त वाहनचालकांची धाकधूक वाढली आहे. १६ ऑगस्टपासून दंडात्मक कारवाई होणार की पुन्हा मुदतवाढ मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
२०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या राज्यातील सर्व वाहनांना 'एचएसआरपी' लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही मोहीम १ जानेवारी २०२५ पासून सुरू झाली असून, तीनदा मुदतवाढ देण्यात आली आहे. परंतु, सुरुवातीपासून 'एचएसआरपी' बसविण्याला संथ प्रतिसाद मिळाला. त्यामुळे सात महिन्यांचा कालावधी होऊनही १९.५७टक्के वाहनांना 'एचएसआरपी' बसविण्यात आलेली आहे. महत्त्वाचे म्हणजे, परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी पुण्यात ११ व १२ ऑगस्ट अशी दोन दिवस राज्यभरातील सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी व उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत फिटमेंट सेंटर वाढविण्याची, 'एचएसआरपी' बसविण्यात वाहनचालकांना येणाऱ्या अडचणी दूर करण्याच्या आणि जनजागृती करण्यावर भर देण्यात आला. परंतु, मुदत वाढीबाबत काहीच बोलले नसल्याची माहिती आहे.
'एचएसआरपी' बसविण्यात सिंधुदुर्ग अव्वलराज्यात 'एचएसआरपी' बसवण्याच्या बाबतीत आतापर्यंत सिंधुदुर्ग (एमएच ०८) अव्वल आहे, जिथे ३३ टक्के वाहनांनी ही प्लेट बसवली आहे. त्यानंतर वर्धा (एमएच ३२), नागपूर ग्रामीण (एमएच ४०), सातारा (एमएच ११) आणि गडचिरोली (एमएच३३) या आरटीओ कार्यालयांचा क्रमांक लागतो.
दोन कोटी ५४ लाख ९० हजार वाहनेराज्यात १ एप्रिल २०१९ पूर्वीची दोन कोटी ५४ लाख ९० हजार १५९ जुनी वाहने आहेत. यातील केवळ ४९ लाख ८९ हजार ६५६ वाहनांना 'एचएसआरपी' बसविण्यात आली आहे. पुढील तीन दिवसांत उर्वरित २ कोटी ५ लाख ५०३ वाहनांना म्हणजे जवळपास ८० टक्के अजूनही या प्रक्रियेपासून दूर आहेत. अवघ्या तीन दिवसांत उर्वरित वाहनांना नंबरप्लेट बसवणे अशक्य असल्याने, वाहनचालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.