नागपूर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणार्या बारावीच्या परीक्षेचा निकाल २ जून रोजी जाहीर होणार आहे. प्रत्यक्ष शाळेत जाऊन निकाल पाहण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी ‘ऑनलाईन’ निकालाचा उत्साह, ओढ अन् त्यानंतरची धम्माल हे सर्व तसेच आहे. सोमवारी जाहीर होणार्या बारावीच्या निकालासाठी विद्यार्थ्यांसोबतच उपराजधानीतील शाळा, महाविद्यालये सज्ज झाली आहेत. सोमवारी निकाल दुपारी १ वाजता जाहीर करण्यात येईल. यावेळी विद्यार्थी इंटरनेटसोबतच थेट मोबाईलच्या माध्यमातूनदेखील निकाल पाहू शकतात. सर्व विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांंना टक्केवारी सुधारण्यासाठी परत परीक्षेस सहभागी होण्याची संधी देण्यात येणार आहे अशी माहिती मंडळातर्फे देण्यात आली. नागपूर विभागातून यंदा एकूण १ लाख ६४ हजार ५२२ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले असून त्यात १ लाख ४२ हजार ४९३ नियमित आणि २२ हजार 0२९ पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांंचा समावेश आहे. यात ७९ हजार ६११ मुले आणि ८१ हजार ३४९ मुलींचा समावेश आहे. नागपूर विभागातील नागपूरसह भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा या ६ जिल्ह्यातील ११७६ शाळांसाठी ४४४ केंद्र स्थापण्यात आली होती. देवा, मला पास कर! बारावीच्या निकालाच्या पूर्वसंध्येला उपराजधानीतील निरनिराळ्या प्रार्थनास्थळांमध्ये विद्यार्थी दिसून येत होते. अनेकांचे पेपर चांगले गेले असले तरी मनात धाकधूक असल्याने ते चांगले गुण मिळण्यासाठी प्रार्थना करताना दिसून येत होते. (प्रतिनिधी)
आज बारावीचा निकाल
By admin | Updated: June 2, 2014 02:14 IST