निगरगट्ट प्रशासनासमोर काम कसे करायचे?

By Admin | Updated: October 31, 2014 00:51 IST2014-10-31T00:51:33+5:302014-10-31T00:51:33+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधिसभेच्या बैठकीतील प्रश्नोत्तरांचा कालावधी चांगलाच वादळी ठरला. सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य डॉ.आर.जी.भोयर यांनी विद्यापीठ प्रशासनाच्या कामचलावू

How to work before the bankruptcy? | निगरगट्ट प्रशासनासमोर काम कसे करायचे?

निगरगट्ट प्रशासनासमोर काम कसे करायचे?

नागपूर विद्यापीठ : भोयर यांनी काढले अधिकाऱ्यांचे वाभाडे
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधिसभेच्या बैठकीतील प्रश्नोत्तरांचा कालावधी चांगलाच वादळी ठरला. सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य डॉ.आर.जी.भोयर यांनी विद्यापीठ प्रशासनाच्या कामचलावू धोरणावर जोरदार हल्लाबोल केला. वेगवेगळ््या सदस्यांसोबत निरनिराळी भूमिका घेणाऱ्या प्रशासनाकडून बहुतेक वेळा दिशाभूल करण्यात येते. अशा निगरगट्ट प्रशासनासोबत काम करण्यापेक्षा राजीनामा देणे चांगले या शब्दांत भोयर यांनी कामचुकार अधिकाऱ्यांचे अक्षरश: वाभाडे काढले.
गुरुवारी झालेल्या विधिसभेच्या बैठकीत सदस्यांचा फारसा उत्साह दिसून येणार नाही असे अंदाज विद्यापीठातील अधिकारांनी बोलून दाखविला होता. परंतु नेमके उलटे घडले. प्रशासनाच्या वेळकाढू धोरणासंदर्भात अनेक सदस्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. विद्यापीठाने २४ जुलै २०१४ रोजी अधिसूचना काढून महाविद्यालयांना १०० रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर हमीपत्र मागितले होते. हे हमीपत्र महाराष्ट्र विद्यापीठ कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन करणारे आहे का असा प्रश्न डॉ.आर.जी.भोयर यांनी उपस्थित केला होता. यावर विद्यापीठ प्रशासनाने नाही असे एका शब्दात उत्तर दिले. प्राध्यापकांच्या नियुक्तीबाबत बीसीयुडीने काढलेल्या हमीपत्रात महाविद्यालयांना कुठल्याही प्रकारची बाजू मांडू देण्यात येत नाही. तेव्हा या हमीपत्रातील शेवटला मजकूर रद्द करण्याची मागणी डॉ. भोयर यांनी केली. यावर प्रशासनाकडून बेजबाबदार उत्तर मिळाल्यामुळे भोयर संतप्त झाले.
मी विचारलेले दोन प्रश्न नियमांच्या चौकटीत बसत नसल्याचे कारण देत प्रशासनाने नामंजूर केले. गेल्या ३० वर्षांपासून नियमांत राहूनच प्रश्न विचारत आहे. नेहमी विद्यापीठाला सहकार्य केले. परंतु विद्यापीठाने ज्याप्रकारे वागणूक दिली ती अपमानजनक आहे. प्रशासनाकडे प्रश्न विचारल्यावर कायद्यावर बोट ठेवून एकीकडे लपवाछपवी करण्यात येते. प्रक्रिया सुरू आहे असे नेहमीच उत्तर देऊन दिशाभूल करण्यात येते. विद्यापीठातील अधिकारी केवळ एसीमध्ये बसून गलेलठ्ठ पगार घेतात. कामाशी त्यांना काही घेणेदेणेच नाही. अशा अधिकाऱ्यांना ‘पगार लठ्ठ, अधिकारी मठ्ठ’ असेच म्हणायचे का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
एकाच प्रश्नावर कधी विद्यापीठ चार ओळीची माहिती देते, तर कधी कायद्याचा आधार घेत, ती माहिती देण्यात येत नसल्याचे सांगते. एखाद्या दुसऱ्या सदस्याने संबंधित माहिती विचारली तर त्याला माहिती देण्यात येते. ही बाब आकलनाच्या बाहेरची आहे, असे भोयर म्हणाले.
समन्वयाच्या बाबतीत तर विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांमध्ये ‘आनंदीआनंद’च आहे. वेळेच्या आत माहिती देण्यासाठी ठोस प्रयत्न दिसून येत नाही. कामच करायचे नाही अशा निगरगट्ट प्र्रशासनासोबत काम करण्याची इच्छाच नसून राजीनामा देणे योग्य राहील. यानंतर विधीसभेच्या बैठकीत कधीच येणार नाही, या शब्दांत त्यांनी संतापाला मोकळी वाट करून दिली. भोयर यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे प्रशासनासोबत सदस्यदेखील हादरले. सभागृहात उपस्थित सदस्यांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. प्रभारी कुलगुरुंनी या दिरंगाईबाबत खंत व्यक्त केली व यापुढे असे होणार नाही, असे आश्वासन दिले. (प्रतिनिधी)
विधिसभेत बाहेरची व्यक्ती कशी?
विद्यापीठाच्या विधीसभेच्या बैठकीत बाहेरील व्यक्तींना प्रवेश दिला जात नाही. निरनिराळ्या आंदोलनांचे मागील अनुभव लक्षात घेता प्रशासनाकडून विधीसभेच्या बैठकीदरम्यान कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात ठेवण्यात येते. शिवाय विद्यापीठाची प्रवेशद्वारे बंद ठेवण्यात येतात. गुरुवारी पूर्ण काळजी घेण्यात आली होती. परंतु विधीसभेची बैठक सुरू झाल्यानंतर एका विद्यार्थी संघटनेचा पदाधिकारी चक्क सभागृहात शिरला. ‘वंदे मातरम्’ सुरू असताना आत आलेल्या या पदाधिकाऱ्याला कुणीही अडवले नाही. या पदाधिकाऱ्याने विधीसभेच्या सदस्याशी काही मिनिटे चर्चा केली व त्यानंतर तो बाहेर पडला. परंतु प्रशासनातील कुठल्याही अधिकाऱ्याने यावर आक्षेप घेतला नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते.
फडणवीस यांचे अभिनंदन
शुक्रवारी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांचे विधीसभेने अभिनंदन केले. कुलसचिव डॉ.अशोक गोमाशे यांनी त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. फडणवीस यांनी विधीसभेत नेहमीच विद्यार्थ्यांचे प्रश्न उचलून धरले. राज्याची धुरा सांभाळताना ते जनतेच्या समस्यांना दूर करण्यासाठी तत्परता दाखवतीलच, असा विश्वास सदस्यांनी व्यक्त केला. फडणवीस यांच्यासोबतच आमदार सुनील केदार, पंकज भोयर यांचेदेखील अभिनंदन करण्यात आले. तर सामाजिक, सांस्कृतिक व वैचारिक चळवळीतील प्रबुद्ध नेतृत्व राहिलेले माजी आमदार नेताजी राजगडकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Web Title: How to work before the bankruptcy?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.