कशी होईल वाहतूक सुरळीत?
By Admin | Updated: November 23, 2014 00:37 IST2014-11-23T00:37:47+5:302014-11-23T00:37:47+5:30
नागपूरकरांना बहुप्रतिक्षित असलेल्या रामझुल्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. अधिवेशन काळात रामझुल्याचा उद्घाटन समारंभही पार पडण्याची अपेक्षा आहे. परंतु हा रामझुला सुरू झाल्यानंतर

कशी होईल वाहतूक सुरळीत?
जयस्तंभ चौकात वाहतुकीची कोंडी : रामझुल्यासह पाच रस्ते येणार एकाच ठिकाणी
नागपूर : नागपूरकरांना बहुप्रतिक्षित असलेल्या रामझुल्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. अधिवेशन काळात रामझुल्याचा उद्घाटन समारंभही पार पडण्याची अपेक्षा आहे. परंतु हा रामझुला सुरू झाल्यानंतर जयस्तंभ चौकात वाहतुकीची मोठी कोंडी होण्याची शक्यता असून त्याचा नागरिकांना फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
रामझुल्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून सध्या डांबरीकरणाचे काम सुरू आहे. त्यानंतर हा रामझुला सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला करण्यात येणार आहे. रामझुला जेथे खाली उतरतो त्या परिसरात पाच रस्ते एकत्र येतात. त्यामुळे येथे वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे. रामझुल्यावरून येणारे नागरिक याच चौकात उतरणार आहेत. याशिवाय रामझुल्याच्या शेजारील मेयो हॉस्पिटलकडून येणारे वाहनचालकही येथूनच रेल्वेस्थानकाकडे किंवा गणेश टेकडीच्या उड्डाण पुलावर जातील.
याशिवाय कस्तूरचंद पार्ककडून येणारे प्रवासीही रेल्वेस्थानकावर जाण्यासाठी याच चौकातून मार्ग काढतील. त्यामुळे या चौकात वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रामझुला पुढील चौकात खाली उतरविला असता तर ही कोंडी झाली नसती असे मतही व्यक्त करण्यात येत आहे. आता प्रशासन याबाबतीत काय निर्णय घेते आणि येथे वाहतुकीचा खोळंबा होऊ नये यासाठी काय उपाययोजना करते हे महत्त्वाचे आहे. (प्रतिनिधी)
रेल्वेस्थानकावरील प्रवाशांची गर्दी
रामझुला जेथे खाली उतरतो त्या चौकातून रेल्वेस्थानकावर जाणाऱ्या वाहनचालकांची मोठी गर्दी असते. रेल्वेस्थानकावर दिवसभर प्रवाशांची ये-जा सुरू असते. त्यामुळे अनेक वाहने याच चौकातून दिवसभर रेल्वेस्थानकाकडे जातील. या वाहनांमुळे येथे वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे.
कस्तूरचंद पार्ककडून येणाऱ्या वाहनांचा प्रश्न
दुपारी ४ नंतर कस्तूरचंद पार्ककडून मेयो रुग्णालयाकडे जाणाऱ्या वाहनचालकांची गर्दी वाढते. सायंकाळी ५ वाजता तर सर्व शासकीय कार्यालयांचे कामकाज संपल्यामुळे या रस्त्यावर कमालीची गर्दी पाहावयास मिळते. सायंकाळच्या सुमारास या चौकात मोठी गर्दी होणार असल्यामुळे ही गर्दी आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाला ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.
टेकडी उड्डाणपुलावरील वाहतुकीची कोंडी
टेकडी उड्डाणपुलावरून अनेकजण रेल्वेस्थानकावर येतात. त्यांना उड्डाणपुलावरून खाली उतरल्यानंतर थेट रेल्वेस्थानकावर प्रवेश देण्यात येईल की त्यांना कस्तूरचंद पार्कजवळील सिग्नलपर्यंत फेरा मारावा लागेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे टेकडी उड्डाणपुलावरील वाहतुकीचीही कोंडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
‘डीआरएम’ कार्यालयातील वाहनांचा प्रश्न
रामझुला जेथे खाली उतरतो तेथे बाजूलाच मध्य रेल्वेचे आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे ‘डीआरएम’ कार्यालय आहे. या कार्यालयात असंख्य अधिकारी आणि कर्मचारी काम करतात. त्यांनाही याच चौकातून ये-जा करावी लागणार आहे. त्यामुळे त्यांची वाहने कुठल्या बाजूने काढण्यात येतील हा प्रश्न आहे.