चार महिन्यांत समृद्धीचे २० टक्के काम पूर्ण होणार कसे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:11 IST2021-08-21T04:11:29+5:302021-08-21T04:11:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाच्या कामाला कोरोनामुळे विलंब झाला. मात्र, शिर्डीपर्यंतच्या मार्गाचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण ...

चार महिन्यांत समृद्धीचे २० टक्के काम पूर्ण होणार कसे?
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाच्या कामाला कोरोनामुळे विलंब झाला. मात्र, शिर्डीपर्यंतच्या मार्गाचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, असा दावा सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी नागपुरात केला. मात्र, आतापर्यंत या मार्गावर ८० टक्केच काम पूर्ण झाले आहे. नागपूरकडील भागात अनेक किलोमीटरचे काम योग्य पद्धतीने सुरूच झालेले नाही. अशा स्थितीत चार महिन्यांच शिर्डीपर्यंतचे २० टक्के प्रलंबित काम पूर्ण कसे होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी दुपारी समृद्धी महामार्गाच्या बांधकामाची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. समृद्धी महामार्गाच्या कामाने आता गती घेतली आहे. २०२२ पर्यंत ठाण्यापर्यंत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल. या मार्गावर २० ठिकाणी इंडस्ट्रिअल नोडस् राहणार आहेत. शिवाय ११ लाख झाडे लावण्यात येतील व २५० मेगावॅट सौरऊर्जेचीदेखील निर्मिती होईल. या महामार्गावर वाहने १५० किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने धावतील. त्यामुळे सर्वच साहित्य आवश्यक दर्जाचे असावे, याची सूचना देण्यात आली आहे. दर्जासोबतच कुठलीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असे शिंदे यांनी सांगितले. कोरोनामुळे कामाला विलंब झाला असला तरी महामार्ग बांधणीचा खर्च वाढलेला नाही, असा दावादेखील त्यांनी केला. समृद्धी महामार्गाशेजारीच नागपूर- मुंबई बुलेट ट्रेन सुरू होणार असल्याच्या चर्चा आहेत. याबाबत त्यांना विचारणा केली असता सध्या आमचे लक्ष केवळ महामार्गावरच आहे. बुलेट ट्रेनबाबत विचार केलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
अडथळे आणणाऱ्या राजकीय नेत्यांवर कारवाई
राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पात शिवसेना नेत्यांमुळे अडथळे येत असल्याचा लेटरबॉम्ब केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी टाकला होता. यासंदर्भात विचारणा केली असता समृद्धीमध्ये कुणीही अडथळे आणलेले नाही व भूमी अधिग्रहण योग्य प्रक्रियेनुसार सुरू असल्याचे शिंदे यांनी सांगितले. विकासकामांना सर्वांनी साथ द्यायला हवी. राज्य किंवा राष्ट्रीय प्रकल्पांत कुणी अडथळे आणत असेल, तर संबंधित राजकीय नेते, पदाधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी, असे प्रतिपादन त्यांनी केले.