शासनाचा ऑनलाईन प्रश्नसंच ग्रामीण भागात किती उपयोगी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:07 IST2021-03-17T04:07:53+5:302021-03-17T04:07:53+5:30
नागपूर : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांकरिता ...

शासनाचा ऑनलाईन प्रश्नसंच ग्रामीण भागात किती उपयोगी?
नागपूर : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांकरिता प्रश्नसंच ऑनलाईन तयार करण्यात आला आहे. हा प्रश्न संच ग्रामीण भागात उपयोगी ठरेल का? असा सवाल शिक्षकांचा आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी तरी छापील संच देण्यात यावा, अशी शिक्षकांची मागणी आहे.
शासनाने ऑनलाईन शिक्षणावर भर देताना मागास जिल्ह्यांचा विचार केला नसल्याचे वेळेवेळी दिसून आले. ऑनलाईनची सुविधा आणि साहित्यही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे नाही. त्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण पूर्ण होऊ शकले नाही. आता शासनाने विद्यार्थ्यांकरिता ऑनलाईन प्रश्नसंच उपलब्ध करून दिला आहे. ऑनलाईन प्रश्न संचातही काही त्रुटी आहेत, इयत्ता दहावीच्या प्रश्नसंचात काहीच विषयाचे पेपर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहेत. विद्यार्थी जेव्हा ही लिंक उघडतो तेव्हा ‘आपला ठाकरे’ असा ब्लॉग ओपन होतो, इथे विद्यार्थ्यांचा राजकारणाशी काय संबंध अशी चर्चा शिक्षण वर्तुळात रंगत आहे. वेगवेगळ्या ऑनलाईन शिकवणी वर्गाच्या अप्लिकेशन पुढे येतात. तसेच लिंक ओपन व्हायला बराच वेळ लागतो, मोठ्या प्रमाणात डाटा खर्च होतो, त्यासाठी इंटरनेट व अॅण्ड्रॉईड मोबाईलची गरज आहे.
- शिक्षण विभागाने ऑनलाईन प्रश्न पेढ्यातयार केल्यात पण ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल, इंटरनेट व प्रिंटर नाहीत त्यांना काय उपयोग? ऑनलाईनऐवजी छापील प्रश्नसंच ग्रामीण, दुर्गम, डोंगराळ व आदिवासींच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देणे आवश्यक होते.
अनिल शिवणकर, संयोजक, भाजप शिक्षक आघाडी