कैसे बताए, क्या गुजर रही है हम पर!
By Admin | Updated: July 24, 2015 02:30 IST2015-07-24T02:30:49+5:302015-07-24T02:30:49+5:30
प्रसारमाध्यमांचा गराडा, डोळे वर करून पाहण्याचीदेखील सोय नाही. प्रत्येक पाऊल टाकताना स्पष्टपणे झळकणारी निराशा, घाबरलेले-भेदरलेले डोळे अन् पतीला ‘आखरी अलविदा’ केल्यानंतर ...

कैसे बताए, क्या गुजर रही है हम पर!
याकूब मेमनच्या कुटुंबीयांचा उद्विग्न सवाल : आखरी अलविदा अन् दाटून आलेला हुंदका
योगेश पांडे / दयानंद पाईकराव नागपूर
नागपूर : प्रसारमाध्यमांचा गराडा, डोळे वर करून पाहण्याचीदेखील सोय नाही. प्रत्येक पाऊल टाकताना स्पष्टपणे झळकणारी निराशा, घाबरलेले-भेदरलेले डोळे अन् पतीला ‘आखरी अलविदा’ केल्यानंतर नागपूर सोडताना दाटून आलेला परंतु महत्प्रयासाने दाबून ठेवलेला हुंदका. डब्यातील सर्व प्रवाशांची प्रश्नार्थक नजर त्यांच्यावरच खिळली असताना अचानक तोंडातून शब्द बाहेर पडतात, आज जैसे कयामत का दिन है. कैसे बताए, क्या गुजर रही है हम पर!
मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी याकूब मेमनला ३० जुलै रोजी फाशी देण्यात येणार आहे. अखेरची भेट घेण्यासाठी याकूबची पत्नी राहिन, मुलगी झुबेदा व मेव्हणी नागपूरला आल्या होत्या. दिवसभरात त्यांनी एकदाही प्रतिक्रिया दिली नाही. अखेर दुरंतो एक्स्प्रेसने मुंबईला परतत असताना ‘लोकमत’ प्रतिनिधीने त्यांच्या समोरील बर्थवर बसूनच सहप्रवाशांशी त्यांच्याबाबत होत असलेल्या संभाषणातून त्यांच्या भावना टिपल्या.
मेमन कुटुंबीयांपैकी कुणीही प्रतिक्रिया देण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यामुळे त्यांना बोलते करण्याचा प्रयत्न न करता ‘लोकमत’ प्रतिनिधीने दुरंतो एक्स्प्रेसमधील बी-४ कोचमधील त्यांच्या ३३, ३४, ३५ या ‘बर्थ’समोर बसूनच त्यांच्या भावना टिपल्या. शेजारीच बसलेल्या मुस्लिम तरुणीने त्यांची अवस्था पाहून राहिन मेमनच्या खांद्यावर हात ठेवला. लागलीच राहिन अन् झुबेदा यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. झुबेदाचा तर डोळ्यांसह पूर्ण चेहरा झाकलेला होता. परंतु इतका वेळ दाबून ठेवलेला तिचा हुंदका बाहेर निघाला. ‘हमने मुल्क मे वापिस आ कर गलती की.
‘हमे अल्लाताला पे पुरा भरोसा है’
मेमन कुटुंबीय १७, १८ आणि १९ या बर्थवर बसल्यानंतर त्यांना प्रसारमाध्यमांनी घेरले. प्रतिक्रिया देण्याचा आग्रह केला. परंतु मेमन परिवारातील एकही सदस्य बोलण्यास तयार नव्हते. ‘हमे कुछ भी नही बोलना, हम पहले से ही बहोत परेशान है प्लीज हमे और परेशान मत करो’ असे ते वारंवार प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगत होते. इक्बाल नावाच्या नातेवाईकाने ‘हमे अल्लाताला पर पुरा भरोसा है, जो कुछ होगा वो अल्लाह की मर्जी’ अशी प्रतिक्रिया दिली.