फसवणूक कशी थांबवाल
By Admin | Updated: December 8, 2015 03:55 IST2015-12-08T03:55:56+5:302015-12-08T03:55:56+5:30
गुंतवणूकदारांची फसवणूक थांबविण्यासाठी राज्य शासन काय उपाययोजना करीत आहे, अशी विचारणा मुंबई उच्च

फसवणूक कशी थांबवाल
हायकोर्टाची विचारणा : महाधिवक्त्यांना मागितली माहिती
नागपूर : गुंतवणूकदारांची फसवणूक थांबविण्यासाठी राज्य शासन काय उपाययोजना करीत आहे, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी करून यावर महाधिवक्त्यांमार्फत ११ डिसेंबर रोजी माहिती सादर करण्याचे निर्देश दिले.
शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणाऱ्या वासनकर वेल्थ मॅनेजमेंट कंपनीचा सर्वेसर्वा प्रशांत वासनकरची पत्नी भाग्यश्री व भाऊ विनय यांच्या जामीन अर्जावर सुनावणी केल्यानंतर न्यायालयाने हा मुद्दा उपस्थित केला. प्रकरणावर न्यायमूर्ती अरुण चौधरी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. भाग्यश्रीने नागपुरातील अंबाझरी व अमरावतीतील फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात जामीन मिळण्यासाठी दोन वेगवेगळे अर्ज सादर केले आहेत. विनयनेही असेच दोन अर्ज केले होते. काही दिवसांपूर्वी त्याला अमरावतीतील गुन्ह्यात जामीन मिळाला. त्याचा नागपुरातल्या गुन्ह्यातील अर्ज प्रलंबित आहे. दोन्ही आरोपींच्या अर्जांवर एकत्र सुनावणी करण्यात येत आहे.वासनकर वेल्थ मॅनेजमेंट कंपनीने वार्षिक ४० ते ५० टक्के व्याजाचे आमिष दाखवून मासिक, तिमाही, वार्षिक, द्विवार्षिक, १८ महिने, ३३ महिने, ४८ महिने इत्यादी मुदतीच्या आकर्षक योजनांतर्गत गुंतवणूकदारांच्या मोठमोठ्या ठेवी स्वीकारल्या. यानंतर कंपनीने मुदत संपूनही ठेवी परत केल्या नाहीत आणि आश्वासनानुसार परतावाही दिला नाही. भाग्यश्रीने वासनकर वेल्थ मॅनेजमेंटचा पैसा स्वत:च्या खात्यात वळवून ५ कोटी ५८ लाख रुपये किमतीचे शेअर्स खरेदी केले होते. ती परिधी ट्रेडिंगची संचालक होती.(प्रतिनिधी)