मनुष्यबळ नाही तर कोरोना रोखायचा कसा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:07 IST2021-04-07T04:07:34+5:302021-04-07T04:07:34+5:30
मनपा प्रशासनाला पडला प्रश्न : आरोग्य सेवेतील रिक्त पदे भरण्याची गरज लोकमत न्यूज नेटवर्क कोविड रुग्णांची संख्या वाढत ...

मनुष्यबळ नाही तर कोरोना रोखायचा कसा?
मनपा प्रशासनाला पडला प्रश्न : आरोग्य सेवेतील रिक्त पदे भरण्याची गरज
लोकमत न्यूज नेटवर्क
कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यावर उपाययोजना करण्यासाठी महापालिका प्रशासन कामाला लागले आहे. कोरोना चाचणी केंद्र सुरू करण्यात आले आहे. २७ कोविड चाचणी केंद्र व फिरते केंद्र सुरू करण्यात आले आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, १०० हून अधिक लसीकरण केंद्राच्या माध्यमातून लसीकरण, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार अशा स्वरूपाच्या जबाबदाऱ्या मनपा प्रशासनाला पार पाडाव्या लागत आहेत. यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून निधी उपलब्ध केला जात आहे. कोरोनासाठी निधीची कमी नाही. परंतु मनुष्यबळ पुरेसे नसल्याने मनपा प्रशासनाला अडचणीचा सामना करावा लागत आहे.
नागपूर शहरात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३० हजारांहून अधिक आहे. दररोज ३५०० च्या आसपास पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची वाढत असल्याने हॉटस्पॉट भागात कंटेन्मेंट झोन तयार करून कान्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देणे गरजेचे आहे. परंतु मनुष्यबळाचा अभाव आहे. वर्षभरापासून कोरोना नियंत्रणात कामावर असलेले कर्मचारी व शिक्षक सेवा देत आहेत. कोरोना कामातील कर्मचाऱ्यांना काही दिवस विश्रांती देण्यासाठी खासगी शाळांवरील शिक्षक व शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी मनपा कर्मचाऱ्यांनी केली आहे.
.....
कोविड सेंटरला अधिक सक्षम करावे
कोरोनाची कमी लक्षणे असलेल्या रुग्णांना होम आयासोलेशनमध्ये ठेवले जाते. परंतु घरी व्यवस्था होत नसल्यास अशा रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये ठेवले जाते. सध्या पाचपावली, व्हीएनआयटी व आमदार निवास आदी ठिकाणी कोविड केअर केंद्र सुरू आहे. मात्र रुग्णांची संख्या विचारात घेता मनपाने कोविड केअर सेंटरला अधिक सक्षम करण्याची गरज आहे.
..
निधीची कमी नाही
कोरोना उपाययोजनांसाठी शासनाकडून निधी मिळत आहे. जवळपास २९ कोटी आजवर प्राप्त झाले. मागणीनुसार निधी मिळत आहे. गरज भासल्यास आणखी कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येतील.
राम जोशी, अतिरिक्त आयुक्त, मनपा