कशी ही बनवाबनवी?
By Admin | Updated: July 14, 2014 02:47 IST2014-07-14T02:47:57+5:302014-07-14T02:47:57+5:30
यंदा मान्सून लांबल्याने महागाईत भाज्यांच्या वाढीव दराची

कशी ही बनवाबनवी?
भाज्यांच्या दरात प्रचंड तफावत : नियंत्रण कुणाचे?
नागपूर : यंदा मान्सून लांबल्याने महागाईत भाज्यांच्या वाढीव दराची भर पडली आहे. बहुतांश गृहिणी भाज्यांची खरेदी घरासमोर करीत असल्याचा फायदा किरकोळ विक्रेते घेत आहेत. रविवारी ठोक बाजारात ४० रुपये किलोचा दराची कोथिंबीर किरकोळमध्ये १२० रुपये तर ५० रुपये किलोची मिरची १०० आणि ४० च्या टमाटरची १०० रुपयांत विक्री सुरू आहे. दरांच्या बनवाबनवीने गृहिणींचे महिन्याचे बजेट पूर्णत:च बिघडले आहे.
बाजारपेठेत ठोक आणि किरकोळमधील भावात प्रचंड तफावत दिसून येत आहे. ठोक बाजारात खरेदी केलेल्या भाज्या खराब होत असल्याने आम्हाला जास्त भावाने विकाव्या लागतात, शिवाय दिवसभरात १०० रुपयांचे २०० रुपये झाले नाही तर भाज्या विकण्यात मजा नाही, असे किरकोळ विक्रेत्यांनी सांगितले. अर्थात किरकोळ विक्रेते १०० ते १५० टक्के नफा कमावून भाज्यांची विक्री करीत आहेत.
नियंत्रणासाठी शासकीय यंत्रणा असावी, अशी गृहिणींची मागणी जोर धरू लागली आहे. यासाठी तातडीने पाऊल उचलावे, अशी अपेक्षा आहे.
मागणी व पुरवठ्याचे प्रमाण योग्य
या मोसमात भाज्यांचे भाव कमी असतात, ही बाब खरी आहे. पण यावर्षी मान्सून वेळेवर न आल्याने आवक कमी असली तरीही मागणी आणि पुरवठ्याचे गणित तंतोतंत आहे. किरकोळमध्ये भाव वाढल्याचे काहीही कारण नसल्याचे ठोक विक्रेत्यांचे मत आहे. कळमना बाजारात रविवारी ५० मोठे ट्रक आणि ३ ते ८ टन वजनाच्या १०० गाड्यांची आवक होती. सध्या पाऊस नसल्याने वांगे किडरहित आहे. स्थानिकांसह बाहेरगावातून मोठ्या प्रमाणात आवक आहे. त्यामुळे कळमना ठोक बाजारात वांगे ४ रुपये किलो, पत्ता कोबी १० ते १२ रुपये, फुलकोबी १५ ते २० आणि कोहळे ५ ते ६ रुपये किलो दराने विक्री झाली.
फुलकोबी कोल्हापूर येथून येत आहे. नारायणगाव, इंदूर, हवेली येथून टमाटर, पत्ता कोबी बेळगाव व मुलताई, कोथिंबीर लातूर व नांदेड, गवार हैदराबाद, हिरवी मिरची हावेरी (कर्नाटक), सिमला मिरची सांगली व नाशिक, भंडारा व मंडला (मध्य प्रदेश) कारले आणि वांगे नागपूर, दिग्रस, परतवाडा, अंजनगाव, वरुड व आंध्र प्रदेशातून येत आहेत. जुलैच्या अखेरीस भाव कमी होण्याचे संकेत आहेत.(प्रतिनिधी)
किरकोळमध्ये कांदे व बटाटे ३० रुपये
केंद्र सरकारच्या निर्बंधानंतर कांदे आणि बटाट्याचे भाव आटोक्यात आहेत. किरकोळमध्ये ३० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. कळमना ठोक बाजारात लाल कांदे १७ ते २१ रुपये किलो असून आवक दररोज १० ते १२ ट्रक आणि पांढरे कांदे १७ ते १९ रुपये किलो तर आवक १० ते १२ ट्रक असल्याची माहिती कळमन्यातील आलू-कांदा असोसिएशनचे अध्यक्ष जयप्रकाश वसानी यांनी लोकमतशी बोलताना दिली. भाज्याच्या किमती वाढताच बटाट्याला मागणी वाढली. ठोक बाजारात रविवारी दर्जानुसार भाव प्रति किलो १८ ते १९ रुपये होते. किरकोळमध्ये ३० रुपयात विक्री सुरू आहे. कळमन्यात छिंदवाडा, आग्रा, कानपूर, अहमदाबाद येथून आवक आहे.