कशी हवी ‘स्मार्ट सिटी’ ?

By Admin | Updated: October 11, 2015 02:54 IST2015-10-11T02:54:55+5:302015-10-11T02:54:55+5:30

सुंदर, सुरक्षित आणि स्वच्छ नागपूरसह ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पावर नागपूर महानगरपालिका काम करीत आहे.

How to 'smart city'? | कशी हवी ‘स्मार्ट सिटी’ ?

कशी हवी ‘स्मार्ट सिटी’ ?

मनपा येणार आपल्या दारी : एक हजार कर्मचारी नोंदविणार नागरिकांच्या सूचना
नागपूर : सुंदर, सुरक्षित आणि स्वच्छ नागपूरसह ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पावर नागपूर महानगरपालिका काम करीत आहे. मात्र, नागपूरकरांना स्मार्ट सिटी कशी हवी आहे, हे जाणून घेण्यासाठी आता महापालिकेचे सुमारे एक हजार कर्मचारी घरोघरी जाणार आहेत. नागरिकांच्या सूचना ऐकून त्याची नोंदही करणार आहेत. यासाठी १३ ते १८ आॅक्टोबरदरम्यान विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. नागरिकांकडून येणाऱ्या या सूचनांचा एक डाटाबेस तयार करून ‘व्हिजन डॉक्युमेंट’ तयार केले जाईल. केंद्र सरकारला सोपविण्यात येणाऱ्या या प्रकल्प प्रस्तावात त्या सूचनांचाही समावेश केला जाईल.
महापौर प्रवीण दटके यांनी या मोहिमेसंदर्भात माहिती देताना सांगितले की, ‘स्मार्ट सिटी प्रकल्प’ नागरिकांसाठीच तयार केला जात आहे. तेव्हा त्यांना दुर्लक्षित करता येणार नाही. स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी चांगल्या व योग्य सूचना मागविण्यात आल्या होत्या. १४०० च्या जवळपास सूचना आॅनलाईन व आॅफलाईन आल्या आहेत. स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये नागरिकांची मते जाणून घेणे आवश्यक आहे. त्याचे क्रेडिट पॉर्इंट मिळतील. कर्मचारी घरोघरी जाऊन अर्ज भरून घेतील. त्यात नाव, पत्ता आणि सूचनांचे विकल्प असतील. एखाद्या व्यक्तीला स्वतंत्रपणे सूचना द्यायची असेल तर तो ती सूचना त्या फॉर्मसह जोडू शकतो. प्रत्येक सूचनेला गांभीर्याने घेतले जाईल. नागरिकांच्या म्हणण्यानुसारच शहराला स्मार्ट करावयाचे आहे. जो डाटा तयार होईल, त्याचा डाटा बेस तयार करण्यासाठी महाविद्यालयांची मदत घेतली जाईल. स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी ९० दिवसांचा अवधी मिळाला आहे. १५ डिसेंबरपूर्वी पूर्ण प्रकल्पावरील काम व्यवस्थितपणे पूर्ण केले जाईल. राहिली गोष्ट वर्षाला ५० कोटी रुपये जमविण्याची तर त्यासाठी राज्य सरकारची मदत, वित्त संस्थांकडून कर्ज आदी पर्यायांवरही चर्चा सुरू आहे. स्मार्ट सिटीसाठी आलेल्या प्रस्तांवाची छाननी सुरू आहे. लवकरच सर्वश्रेष्ठ २० प्रस्तांवाची निवड केली जाईल. या दरम्यान वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेतला जाईल. यासाठी एक बैठक आयोजित करण्यात येत आहे. प्रोजेक्ट तयार करण्यासाठी क्रिसिल कंपनीला अधिकृत करण्यात आले आहे. सोबतच लोकांकडून अर्ज भरण्याच्या अभियानात डिलिवरिंग चेंज फाऊंडेशनची मदत घेतली जाईल. पत्रकार परिषदेला उपमहापौर मुन्ना पोकुलवार, स्थायी समिती अध्यक्ष रमेश सिंगारे, सत्तापक्ष नेता दयाशंकर तिवारी उपस्थित होते.
स्मार्ट सिटीसाठी वॉर रूम तयार
नागपूर : विशेष अभियानाला प्रभावीपणे आणि जलदगतीने पूर्ण करण्यासाठी मनपा आयुक्त कार्यालयाजवळील ‘व्हिजिटर रूम’ला ‘वॉर रूम’ म्हणून तयार करण्यात आले आहे. यात विविध महाविद्यालयातील विद्यार्थी, क्रिसिलचे कर्मचारी, मनपाचे कर्मचारी कॉम्प्युटरमध्ये डाटा एन्ट्रीचे काम करतील. सात लाख अर्ज छापण्यात येत आहे. पाच लाख घरांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष निश्चित करण्यात आले आहे.
असा आहे अर्ज
अर्जात लिहिले आहे ‘प्रिय नागपूरकर आपले नागपूर स्मार्ट सिटी होणार आहे.
आपल्या नजरेत ‘स्मार्ट सिटी’चा खरा अर्थ काय आहे. हे समजल्यानंतरच या दिशेने पुढची दिशा निश्चित होईल. आपण आपली अमूल्य दोन मिनिटे देऊन हा अर्ज भरावा.
यामध्ये पूर्ण विवरण दिले आहे. यात स्वच्छता, ग्रीनरी, संतुलित विकास, समृद्धी, डिजिटल कनेक्ट, सुरक्षा व इतर पर्यायांबाबत विचारणा करण्यात आली आहे. सोबतच रोजगाराच्या संधी, महिला सुरक्षा, पाण्याची उपलब्धता, कचरा, खेळ, आरोग्य आदींबाबतही प्रश्न विचारण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: How to 'smart city'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.