देशाच्या हृदयस्थळाचे जतन कसे होणार?
By Admin | Updated: April 18, 2016 05:37 IST2016-04-18T05:37:12+5:302016-04-18T05:37:12+5:30
देशाचे भौगोलिक मध्यवर्ती ठिकाण म्हणजे नागपूर आणि नागपूर शहरातील झिरो माईलचा स्तंभ म्हणजे देशाचा

देशाच्या हृदयस्थळाचे जतन कसे होणार?
नागपूर : देशाचे भौगोलिक मध्यवर्ती ठिकाण म्हणजे नागपूर आणि नागपूर शहरातील झिरो माईलचा स्तंभ म्हणजे देशाचा भौगोलिक मध्यवर्ती बिंदू होय. येथून देशभरातील शहरांचे अंतर मोजले जाते. त्यामुळे हे ठिकाण नागपूर शहराचेच नव्हे तर देशाचे मानचिन्ह व देशाचे हृदयस्थळ म्हणूनही ओळखले जाते. परंतु देखभाल-दुरुस्तीअभावी झिरो माईलच्या स्तंभाला तडे पडले आहेत. परंतु याकडे कुणाचेही लक्ष नाही. त्यामुळे देशातील या हृदयस्थळाचे जतन कसे होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नागपूर हे देशातील मध्यवर्ती शहर आहे. याची जाण ठेवून स्वातंत्र्यपूर्व काळात एका इंग्रज अधिकाऱ्याने देशातील या मध्यवर्ती ठिकाणचे भौगोलिक मध्यबिंदू शोधून काढले. देशाचे ते भौगोलिक मध्यबिंदू म्हणजे आपले झिरो माईल होय. या ठिकाणी एक सुंदर असा स्तंभ उभारण्यात आला. हा स्तंभ गोवारी शहीद स्मारक व रिझर्व्ह बँक चौक यादरम्यान उभारण्यात आला आहे. हा स्तंभ कधी उभारण्यात आला, याचा कालावधी दर्शविला नाही. परंतु याच्या बाजूलाच एक दुसरा दगडसुद्धा उभारण्यात आला आहे. त्यावर १९०७ हे वर्ष नोंदविलेले असून, त्यात
समुद्रसपाटीपासूनच्या अंतराची नोंद आहे. त्यावरून असे आढळून येते की, झिरो माईलच्या स्तंभाची निर्मिती कदाचित यावर्षी करण्यात आली असावी, असे मानले जाते. या स्तंभाची निर्मिती वालुकाश्मापासून करण्यात आली आहे. त्याचा पायवा गोलाकार असून, त्याचा परीघ ७.९० मीटर इतका आहे. त्याचा पायवा हा षटकोणी आहे. या षटकोणी दगडाचा एक भाग हा एक मीटरचा आहे. या षटकोणी दगडाची उंची ६.५ मीटर एवढी आहे. या षटकोणी दगडावर विविध शहरांचे अंतर दर्शविले आहे.
नागपूर शहरातील चारही बाजूंनी असलेल्या शहराचे अंतर मोजण्यात आले.
वेकोलिने स्वीकारली
होती जबाबदारी
यासंदर्भात हेरिटेज कमिटीच्या पदाधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, झिरो माईलचा विकास करण्याचा मुद्दा समितीच्यापुढे आला होता. तेव्हा वेकोलिने याच्या विकासाची जबाबदारी स्वीकारली होती. त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली होती. त्यासंदर्भात नासुप्रची मंजुरी घेऊन तसा प्रस्ताव हेरिटेज कमिटीकडे पाठवावयाचा होता, परंतु पुढे काय झाले, कुणालाच माहीत नाही. तेव्हा याचा विकास करणार तरी कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.