तलावांची कशी करणार दुरुस्ती
By Admin | Updated: August 6, 2015 02:52 IST2015-08-06T02:52:37+5:302015-08-06T02:52:37+5:30
शासनाकडून प्राप्त होणारा निधी व सेस फंडातील तरतुदीतून जिल्ह्यातील लघु सिंचन तलाव, मामा तलाव, पाझर तलाव, साठवण ..

तलावांची कशी करणार दुरुस्ती
नागपूर : शासनाकडून प्राप्त होणारा निधी व सेस फंडातील तरतुदीतून जिल्ह्यातील लघु सिंचन तलाव, मामा तलाव, पाझर तलाव, साठवण व कोल्हापुरी बंधाऱ्यांची देखभाल व दुरूस्तीची कामे केली जात होती. परंतु प्रशासनाने हा निधी जलयुक्त शिवारकडे वळविला आहे. त्यामुळे तलाव व बंधाऱ्यांच्या दुरुस्तीची कामे कशी करणार, असा प्रश्न बुधवारी जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या बैठकीत सदस्यांनी उपस्थित केला.
तलाव व बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून दरवर्षी ५ ते ६ कोटी व सेस फंडातील २ कोटी असा ७ ते ८ कोटीचा निधी उपलब्ध असायचा. परंतु हा निधी जलयुक्त शिवार योजनेसाठी वळविण्यात आला आहे. या योजनेसाठी ३११ गावांची निवड करण्यात आली आहे. याच गावात सिंचन योजना राबविण्याचे शासनाने निर्देश दिले आहे. जिल्ह्यात १२३ लघु सिंचन तलाव , ५६ पाझर तलाव, ७ पाझर तलाव, ३९ गाव तलाव, २१४ मालगुजारी तलाव, ८८७ साठवण बंधारे, ७२८ कोल्हापुरी बंधारे आहेत. परंतु यात मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला आहे. पाट दुरुस्ती व गेट दुरुस्तीची गरज आहे. दुरुस्ती न झाल्याने तलाव व बंधाऱ्यांची सिंचन क्षमता कमी झाली आहे. परंतु निधी नसल्याने ही कामे रखडली आहेत.
कुही तालुक्यातील ८५ मामा तलावांची दुरुस्तीचा मुद्दा सदस्य मनोज तितरमारे यांनी उपस्थित केला. जिल्ह्यातील इतर तालुक्यातील परिस्थिती अशीच आहे. पाट व गेट दुरुस्ती नसल्याने तलाव व बंधाऱ्यात पाणीसाठा होत नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. जलयुक्त शिवार योजनेसाठी निवड करताना जिल्हाधिकाऱ्यांनी जि.प. व पं.स. सदस्य, पदाधिकारी यांना विश्वासात घ्यावे, अशी मागणी सदस्यानी केली. हा प्रस्ताव प्रशासनाकडे पाठविण्याचे निर्देश अध्यक्ष निशा सावरकर यांनी दिले.
मामा तलाव मासेमारीसाठी लिजवर देण्यात आले आहे. परंतु यात शिंगाड्याचे उत्पादन घेतले जाते. आसलवाडा, चिखली व सेलू या तलावात शिंगाड्याचे उत्पादन घेतले जात आहे. शिंगाड्यावर जंतुनाषकाची फवारणी केली जाते. यामुळे तलावाचे पाणी दूषित झाल्याने गुरांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. तसेच तलावाच्या पाण्यात कपडे धुणाऱ्या महिलांना विविध आजारांना सामोरे जावर लागत आहे. संबंधितावर कारवाई करण्याची मागणी तितरमारे, विनोद पाटील यांनी केली.
पारशिवनी तालुक्यातील पाणीपुरवठा योजना हस्तांतरित करताना सदस्य कमलाकर मेंघर यांना विश्वासात का घेतले नाही, असा प्रश्न जयकमुार वर्मा यांनी उपस्थित केला. पाणलोट क्षेत्रातील विकास कामे राबविताना दिरंगाई केल्यास संबंधितावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. उपाध्यक्ष शरद डोणेकर, सभापती आशा गायकवाड, उकेश चव्हाण, पुष्पा वाघाडे, दीपक गेडाम यांच्यासह सदस्य व अधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)