३१ जानेवारीची ‘डेडलाईन’ कशी गाठणार ?
By Admin | Updated: January 24, 2016 02:57 IST2016-01-24T02:57:39+5:302016-01-24T02:57:39+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांचे निकाल ३१ जानेवारीपर्यंत घोषित करण्यात येतील असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.

३१ जानेवारीची ‘डेडलाईन’ कशी गाठणार ?
नागपूर विद्यापीठ : परीक्षा विभागासमोर मोठे आव्हान
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांचे निकाल ३१ जानेवारीपर्यंत घोषित करण्यात येतील असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. परंतु निकालांचा सध्याचा वेग लक्षात घेता हा दावा पूर्ण करणे हे परीक्षा विभागासमोरील मोठे आव्हानच राहणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत २०६ निकाल जाहीर झाले आहेत. त्यामुळे ८ दिवसांत ४०० हून अधिक निकाल लागणार का हा प्रश्न उपस्थित होत आहे.
हिवाळी परीक्षांपासून विद्यापीठाने सर्व व्यावसायिक परीक्षांचे ‘आॅनस्क्रीन’ मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मूल्यांकनाचा वेग वाढेल, असा दावा प्रशासनातर्फे करण्यात आला होता. परंतु अनेक परीक्षा आटोपून ४५ दिवस उलटून गेले असूनदेखील विद्यार्थ्यांना निकालांची प्रतीक्षाच आहे. अनेक परीक्षांचे निकाल हे ‘डेटा ट्रान्सफर’मध्ये अडथळे आल्यामुळे खोळंबले होते.
बहि:शाल विद्यार्थी, तसेच अगोदर नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती योग्य तऱ्हेने विद्यापीठापर्यंत पोहोचली नाही. अनेक विद्यार्थ्यांनी चुकीचे नामांकन क्रमांक भरले होते. त्यामुळे निकालाशी संबंधित ‘सॉफ्टवेअर’मध्ये तांत्रिक ‘एरर’ दाखविण्यात येत होता.
ही अडचण दूर झाल्यानंतर निकालांचा वेग काही प्रमाणात वाढला असला तरी अनेक निकाल प्रलंबित आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत २०६ निकाल जाहीर झाले आहेत.
परंतु प्रत्यक्ष संकेतस्थळावर मात्र १५१ निकालांचीच यादी दर्शविण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
अभियांत्रिकीचे निकाल लागणार
अभियांत्रिकी अभ्यासक्रमांचे निकाल ही विद्यापीठासाठी नेहमीचीच डोकेदुखी असते. यंदा अभियांत्रिकीच्या उत्तरपत्रिकांचे ‘आॅनस्क्रीन’ मूल्यांकन करण्यात येत आहे. परंतु त्याला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे लक्षात येताच परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांनी सर्व महाविद्यालयाच्या प्राचार्यांची बैठक घेतली होती. यानंतर मूल्यांकनाचा वेग वाढला होता. अभियांत्रिकीचे निकाल या आठवड्यात लागण्यास सुुरुवात होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. परीक्षा नियंत्रक डॉ.नीरज खटी यांच्याशी यासंदर्भात संपर्क होऊ शकला नाही.