रेल्वेस्थानकाची सुरक्षा कशी करणार ?
By Admin | Updated: January 23, 2015 02:35 IST2015-01-23T02:35:23+5:302015-01-23T02:35:23+5:30
रेल्वेस्थानकात प्रवेश करण्याची अनेक प्रवेशद्वारे आहेत. रेल्वेस्थानकावर सिक्युरिटी इंटिग्रेटेड सिस्टीम सुरू केल्यास रेल्वेस्थानकाच्या सुरक्षेची जबाबदारी कशी पार पाडाल, ....

रेल्वेस्थानकाची सुरक्षा कशी करणार ?
नागपूर : रेल्वेस्थानकात प्रवेश करण्याची अनेक प्रवेशद्वारे आहेत. रेल्वेस्थानकावर सिक्युरिटी इंटिग्रेटेड सिस्टीम सुरू केल्यास रेल्वेस्थानकाच्या सुरक्षेची जबाबदारी कशी पार पाडाल, असा सवाल मध्य रेल्वेचे अप्पर महाव्यवस्थापक आर. डी. त्रिपाठी यांनी नागपूर विभागातील अधिकाऱ्यांना करून रेल्वेस्थानकाच्या सुरक्षेबाबतचा मुद्दा उपस्थित केला.
मध्य रेल्वेचे अप्पर महाव्यवस्थापक आर. डी. त्रिपाठी यांनी गुरुवारी नागपूर रेल्वेस्थानकाचा पाहणी दौरा केला. त्यांनी वातानुकुलित उच्च श्रेणी प्रतिक्षालय, महाराजा विश्रामगृह, बेस किचन, पार्सल कार्यालय, संगणकीकृत आरक्षण कार्यालय, तिकीट बुकींग, स्टेशन सर्क्युलेटिंग एरीया, रेल्वेस्थानकाची साफसफाई, पूर्व आणि पश्चिमेकडील भागातील एस्क्लेटर, होम प्लॅटफार्मचे निरीक्षण केले. नागपूर रेल्वेस्थानकावर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सिक्युरिटी इंटिग्रेटेड सिस्टीम बसविण्यास मंजुरी मिळाली आहे.
या यंत्रणेत रेल्वेस्थानकावर अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात येणार आहेत. परंतु पाहणी दरम्यान अप्पर महाव्यवस्थापकांना रेल्वेस्थानकात प्रवेश करण्यासाठी अनेक रस्ते असल्याची बाब लक्षात आली. त्यांनी ही गंभीर बाब ओळखून रेल्वेस्थानकाच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर त्यांनी रेल्वेस्थानकावर सुरु असलेल्या विकास कामांबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी विभागीय रेलवे व्यवस्थापक ओ. पी. सिंह, अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक डॉ. जयदीप गुप्ता, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. सुमंत देऊळकर, रेल्वेस्थानकाचे व्यवस्थापक संजयकुमार दाश यांच्यासह अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रेल्वेस्थानकाच्या पाहणीनंतर अप्पर महाव्यवस्थापकांनी ‘डीआरएम’ कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. (प्रतिनिधी)