खापरखेडा-सिल्लेवाडा मार्ग किती जखमा देणार?
By Admin | Updated: May 29, 2014 03:26 IST2014-05-29T03:26:56+5:302014-05-29T03:26:56+5:30
खापरखेडा-सिल्लेवाडा या मार्गाची सध्या चांगलीच दैनावस्था झाली आहे.

खापरखेडा-सिल्लेवाडा मार्ग किती जखमा देणार?
खापरखेडा : खापरखेडा-सिल्लेवाडा या मार्गाची सध्या चांगलीच दैनावस्था झाली आहे. या मार्गाच्या दुरुस्तीचे कंत्राट देण्यात आले असून, दुरुस्तीच्या नावावर मोठय़ा प्रमाणात गिट्टी टाकण्यात आली. हल्ली या गिट्टीवरून दुचाकी वाहने स्लिप होत असल्याने अपघात घडत आहेत. खापरखेडा ते सिल्लेवाडा हा मार्ग वेकोलिच्या कोळसा खाणीकडे जाण्यासाठी महत्त्वाचा मार्ग असल्याने या मार्गावर वाहनांची सदैव वर्दळ असते. गेल्या काही वर्षांपासून या मार्गाची दुरुस्ती करण्यात न आल्याने चांगलीच दैनावस्था झाली आहे. या मार्गाच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी वेकोलि प्रशासनाकडे आहे. लोकमतमध्ये गुरुवारी ‘कोराडी-खापरखेडा-सिल्लेवाडा मार्ग धोकादायक’ या शीर्षकाखाली वृत्त प्रकाशित करण्यात आले. सदर वृत्त प्रकाशित होताच वेकोलि प्रशासनाने या मार्गाच्या दुरुस्तीचे कंत्राट ताबडतोब कंत्राटदार कंपनीला दिले. हे कंत्राट रोडवरील केवळ खड्डे बुजविण्यासाठी देण्यात आल्याची माहिती जाणकारांनी दिली. या कंत्राटदार कंपनीने याच कामाचे कंत्राट स्थानिक व्यक्तीला दिल्याचे पोटा येथील काही ग्रामस्थांनी सांगितले. या खड्डय़ांमध्ये गिट्टी टाकून त्याचे डांबरीकरण करणे अपेक्षित आहे. मात्र, या खड्डय़ांमध्ये गिट्टी टाकण्याऐवजी रेतीचे छोटे दगड, गिट्टी व मुरुम टाकण्यात आले आहे. ही बाब नियमबाह्य असल्याचे काही जाणकारांचे म्हणणे आहे. कंत्राटदार व वेकोलिच्या सिव्हिल विभागातील अधिकार्यांचे लागेबांधे असल्याने हा प्रकार घडत असल्याचा आरोप भाजपचे रवी फुलझेले यांनी केला आहे. रोडवरील खड्डे बुजविण्यासाठी टाकण्यात आलेली गिट्टी ही अवघ्या २४ तासांत विखुरली आणि रोडवर सर्वत्र पसरली. यात रेती असल्याने त्यावरून दुचाकी वाहने स्लिप होऊन अपघात घडत आहेत. यात चार दिवसांत आठ तरुण जखमी झाले आहेत. काही ठिकाणी मोठी गिट्टी असल्याने वाहने पंक्चर होत असल्याचे प्रकार घडत आहेत. हा मार्ग आणखी किती जणांना जखमी करणार, असा प्रश्न परिसरातील वाहनचालकांनी केला आहे. (प्रतिनिधी)